
आयसीसी ठराविक कालावधीनंतर कसोटी, वनडे आणि टी20 फॉर्मेटची क्रमवारी जाहीर करत असते. प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या स्पर्धा, मालिका आणि सामन्यांचा या क्रमवारीवर फरक पडत असतो. नुकतंच आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली. ही क्रमवारी पाहिल्यानंतर क्रीडाप्रेमींच्या तळपायची आग मस्तकात गेली होती. कारण या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं नाव नव्हतं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं नाव टॉप 100 यादीतून काढून टाकलं होतं. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. कारण मागच्या आठवड्यातील यादीत हे दोन्ही खेळाडू टॉप 5 मध्ये होते. त्यामुळे एका आठवड्यात असं काय झालं की दोन्ही खेळाडूंची नाव गायब झाली. या चुकीमुळे सोशल मीडियावर रान पेटलं होते. क्रीडाप्रेमींनी आयसीसीला खडे बोल सुनावले आणि पोस्ट केल्या. इतकंच काय तर या दोघांनी वनडेतून निवृत्ती घेतली नाही याची आठवण देखील करून दिली.
आयसीसी नियमानुसार, खेळाडूने निवृत्ती घेतल्यानंतरच त्याचं नाव क्रमवारीतून वगळण्यात येतं.तसेच मागच्या 9-12 महिने वनडे खेळला नाही तर नाव वगळलं जातं. रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघाचे सदस्य आहेत. तसेच सक्रिय असून त्यांना हा नियम लागू होत नाही. मागच्या फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी खेळले होते. म्हणजेच तितका कालावधीही झाला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. कारण या दोघांनी गुपचूपपणे निवृत्ती तर घेतनी नाही ना.. या चर्चांना उधाण आलं.
तांत्रिक बिघाडामुळे ही चूक झाल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं. कारण आयसीसीने चूक कबूल केली आणि त्यात सुधारणाही केली. ताज्या आकडेवारीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव वनडे रँकिंगमध्ये आलं आहे. आयसीसी वेबसाईटवरील ताज्या क्रमवारीनुसार, रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर, तर विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. मागच्या आठवड्यातही दोघे याच स्थानावर होते. त्यामुळे त्यांच्या क्रमवारीत काही बदल झालेला नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली आता ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही खेळाडू कसोटी आणि टी20 तून निवृत्ती घेतल्यानंतर आराम करत आहेत.