Icc Odi Ranking : शुबमन गिल नंबर 1 बॅट्समन, बाबरला पछाडलं, टॉप 10 टीम इंडियाचा दबदबा

Shubman Gill Icc Odi Ranking : टीम इंडियाचा उपकर्णधार आणि युवा फलंदाज शुबमन गिल याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी इतिहास घडवला आहे. शुबमन पाकिस्तानच्या बाबर आझमला पछाडत नंबर 1 फलंदाज ठरला आहे.

Icc Odi Ranking : शुबमन गिल नंबर 1 बॅट्समन, बाबरला पछाडलं, टॉप 10 टीम इंडियाचा दबदबा
babar azam and shubman gill icc odi ranking
Image Credit source: Icc
| Updated on: Feb 19, 2025 | 3:17 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्याआधी यजमान पाकिस्तान क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि उपकर्णधार शुबमन गिल पाकिस्तानच्या बाबर आझम याला मागे टाकत आयसीसी वनडे रँकिंगमधील नंबर 1 फलंदाज ठरला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. शुबमनने या रँकिंगमध्ये बाबरचं संस्थान खालसा करत अव्वल स्थानी आपली मोहर उमटवली आहे. तसेच शुबमन गिलसह टीम इंडियाचे एकूण 4 फलंदाज टॉप 10 मध्ये आहेत.

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली होती. शुबमन गिलने या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. शुबमने या मालिकेत 2 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं होतं. टीम इंडियाने या मालिकेत इंग्लंडला क्लिन स्वीप केलं होतं. शुबमन गिलचं यामध्ये मोठं योगदान राहिलं होतं. गिलला या कामगिरीचा फायदा वनडे रँकिंगमध्ये मिळाला आहे. तर दुसऱ्या बाजूला बाबर आझमला ट्राय सीरिजमध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काही खास करता आलं नाही. त्यामुळे बाबरला अव्वल स्थान गमवावं लागलं आहे.

आयसीसी वनडे रँकिंगनुसार, शुबमन गिलच्या खात्यात 796 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर बाबर आझम याच्या खात्यात 773 रेटिंग पॉइंट्स आहेत. बाबरने ट्राय सीरिजमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 10 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 23 धावा केल्या. तर अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 29 धावांची खेळी केली.

टॉप 10 मध्ये 4 भारतीय फलंदाज

वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहेत. टॉप 10 मध्ये शुबमनसह टीम इंडियाचे एकूण 4 फलंदाज आहेत. शुबमन व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस यांचा समावेश आहे. रोहित आणि विराट या दोघांनी त्यांचं तिसरं आणि सहावं स्थान कायम राखलं आहे. तर श्रेयस अय्यर याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. श्रेयसने 10 व्या क्रमांकावरुन नवव्या स्थानी झेप घेतली आहे.

शुबमन गिल जगात भारी

शुबमन गिल चौथा भारतीय

दरम्यान शुबमन गिल वनडे आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 बॅट्समन होण्याचा बहुमान मिळवणारा टीम इंडियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. शुबमनआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांनी ही अशी कामगिरी केली आहेत. तसेच शुबमनची नंबर 1 बॅट्समन होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत 20 फेब्रुवारीला सामना होणार आहे. त्याआधी अशी बातमी मिळाल्याने शुबमनचा विश्वास नक्कीच दुणावला असेल, यात काहीच शंका नाही.