
इंडिया ए टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात 1 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया ए वर 171 धावांनी मात करत दणदणीत विजय साकारला. भारताने यासह 3 मॅचच्या या अनऑफीशियल वनडे सीरिजमध्ये 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. मात्र 48 तासांमध्येच कांगारुंनी पलटवार करत पहिल्या पराभवाची परतफेड केली. उभयसंघात कानपूरमधील ग्रीन पार्कमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात कांगारुंनी भारताचा पराभव करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 247 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने अवघ्या 160 धावा करुन हा सामना जिकंला. तुम्ही म्हणाल, असं कसं? मात्र असंच झालंय.
भारताने कांगारुंसमोर 50 षटकांमध्ये 247 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र सामन्यातील दुसऱ्या डावात पावसाने खोडा घातला. पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे बराच वेळ वाया गेला. त्यामुळे सामना निर्धारित वेळेत निकाली काढण्यासाठी डीएलएस नियम लागू करणयात आला. पावसामुळे तब्बल 25 ओव्हर कमी करण्यात आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 25 ओव्हरमध्ये 160 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 50 बॉलआधी 9 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 16.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 160 रन्स केल्या.
मॅकेंझी हार्वे आणि जॅक फ्रेझर मॅकग्रूक या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली. या दोघांनी 57 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मॅकग्रूक आऊट झाला. मॅकग्रूक याने 20 बॉलमध्ये 36 रन्स केल्या.
तर मँकेझी आणि कूपर कॉनोली या जोडीनेच उर्वरित धावा करत विजयी केलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 103 धावांची भागीदारी केली. मँकेझीने 49 बॉलमध्ये याने 2 सिक्ससह नॉट आऊट 70 रन्स केल्या. तर कूपर कॉनॉलीने 31 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. भारतातडून निशांत सिंधू याने एकमेव विकेट घेतली. तर अर्शदीप सिंह, हर्षित राणा, रवी बिश्नोई, रियान पराग आणि युद्धवीर सिंह चरक हे गोलंदाज निष्प्रभ ठरले.
त्याआधी टॉस जिंकून टीम इंडियाने बॅटिंगचा निर्णय केला. मात्र टॉप आणि मिडल ऑर्डरने घोर निराशा केली. त्यामुळे टीम इंडिया अडचणी सापडली होती. त्यामुळे भारताचे 200 धावा होतील का? असा प्रश्न होता. मात्र तिलक वर्मा आणि रियान या जोडीने निर्णायक योगदान दिलं. तसेच रवी बिश्नोई, हर्षित राणा, सूर्यांश शेंडगे आणि अर्शदीप सिंह या चौघांनी दिलेल्या योगदानामुळे भारताला सन्मानजनक धावा करता आल्या.
आशिया कप स्पर्धेतील भारताचा स्टार ओपनर अभिषेक शर्मा सामन्यातील पहिल्याच बॉलवर आऊट झाला. ओपनर प्रभसिमरन सिंह 1 धावेवर करुन बाद झाला. कॅप्टन श्रेयस अय्यर याने 8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. युद्धवीर सिंह याने 4 धावा केल्या.
रियान पराग याने 58 धावा केल्या. निशांत सिंधू याने 1 धाव केली. सू्र्यांश शेडगे याने 10 धावा केल्या. हर्षित राणा याने 21 धावा जोडल्या. युद्धवीर सिंह याने 4 धावा केल्या. रवी बिश्नोई याने 26 धावांचं योगदान दिलं.
अर्शदीप सिंह 10 धावांवर नाबाद राहिला. एका बाजूला ऑस्ट्रेलियाने भारताला ठराविक अंतराने झटके देणं सुरु ठेवलं होतं. तर तिलक वर्मा शेवटपर्यंत एक बाजू लावून खेळत होता. तिलकला शतक करण्याची संधी होती. मात्र तिलकचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं. तिलक नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. तिलकने 122 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह 94 रन्स केल्या. यासह भारताचा डाव 45.5 ओव्हरमध्ये 246 रन्सवर आटोपला. तर अर्शदीप सिंह 10 धावांवर नाबाद परतला. ऑस्ट्रेलियासाठी कॅप्टन जॅक एडवर्ड्स याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर सदरलँड आणि तनवीर सांघा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनी चांगली साथ दिली.
दरम्यान उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने हा अंतिम सामना जिंकून कोणता संघ मालिका जिंकणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.