IND vs AUS Video : पहिल्याच दिवशी ऋषभ पंतची चूक नडली, भारताला 35 धावांचा दंड; अजून…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु असून डे नाईट आहे. या सामन्यात भारताने पहिल्याच दिवशी नांगी टाकली आहे. भारताचा डाव 180 धावांवर आटोपला. तर दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने 1 गडी बाद 86 धावा केल्या आहेत. या सामन्यात ऋषभ पंतची एक चूक भारताला चांगलीच नडल्याचं दिसत आहे.

IND vs AUS Video : पहिल्याच दिवशी ऋषभ पंतची चूक नडली, भारताला 35 धावांचा दंड; अजून...
Image Credit source: AFP
| Updated on: Dec 06, 2024 | 5:54 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीच्या दृष्टीने भारत ऑस्ट्रेलिया मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेत भारताला काहीही करून 3 सामने जिंकायचेच आहेत. अशा स्थितीत पहिल्या विजयानंतर दुसऱ्या कसोटीत विजयाचा सूर कायम ठेवण्याचं आव्हान भारतीय संघापुढे आहे. पण टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी पहिल्याच दिवशी नांगी टाकल्याचं दिसत आहे. डे नाईट कसोटीत पिंक बॉलचा सामना करताना अडचण येणार यात काही शंका नाही. पण अशा पद्धतीने धडाधड विकेट पडतील अशी कल्पना नव्हती. मधल्या फळीत उतरलेला रोहित शर्माही काही खास करू शकला नाही. भारताने सर्वबाद कशाबशा 180 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत या धावा कमीच आहेत. पण पहिल्या कसोटीचा अनुभव पाहता भारत कमबॅक करेल असं वाटतंय. पण कमबॅक करताना चुका केल्या की त्याचा दंड तर भरावाच लागणार आहे. संघाचं सातवं षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवलं होतं. तिसऱ्या चेंडूवर बुमराहने जवळपास विकेट घेऊन दिली होती. पण ऋषभ पंतने हातातला झेल टाकला आणि भारताला 35 धावांचा फटका बसला.

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि नाथन मॅकस्वीनी ही जोडी मैदानात उतरली होती. त्यामुळे झटपट विकेट घेण्याचं आव्हान टीम इंडियासमोर होतं. त्या पद्धतीने फील्डिंगचं जाळं लावलं होतं. जसप्रीत बुमराहकडे संघाचं सातवं षटक रोहित शर्माने सोपवलं. तिसऱ्या चेंडूवर नाथन मॅकस्वीनीच्या बॅटला घासून चेंडू पहिल्या स्लीप आणि विकेटकीपरच्या मधे उडाला. उजव्या हातावर असल्याने हा झेल आरामात ऋषभ पंत पकडू शकला असता. पण तसं झालं नाही आणि झेल सुटला आणि दोन धावाही गेल्या. मॅकस्वीनीचा झेल सुटला तेव्हा तो 3 धावांवर होता. पण पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मॅकस्वीनी 97 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 38 धावांवर खेळत आहे. जीवदान मिळाल्याने त्याने 35 धावा जोडल्या आणि दुसऱ्या दिवशीही यात भर पडेल यात शंका नाही.

भारताने पहिल्या डावात केलेल्या 180 पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमवून 86 धावा केल्या आहेत. अजूनही ऑस्ट्रेलिया 94 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पाहता आरामात ही आघाडी मोडून काढेल असं वाटत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. कारण ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात आघाडी मिळाली तर ती मोडून काढणं कठीण होईल.