IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियात पंचांकडून रडीचा डाव! केएल राहुल आणि मिचेल मार्शसाठी वेगवेगळा न्याय

एडिलेड पिंक कसोटी सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकलेला आहे. कारण पहिल्या डावातील आघाडी मोडून काढतानाच भारताची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे हा सामना गेल्यातच जमा झाला आहे. असं असताना मिचेल स्टार्कच्या विकेटवरून बराच वाद रंगला आहे.

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियात पंचांकडून रडीचा डाव! केएल राहुल आणि मिचेल मार्शसाठी वेगवेगळा न्याय
| Updated on: Dec 07, 2024 | 4:49 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामना म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी द्वंद्व असतं. त्यामुळे एखादा निर्णय चुकला की क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर वाभाडे काढण्यास मागे पुढे पाहात नाही. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात असंच चित्र पुन्हा पाहायला मिळालं. पण यावेळीही भारताच्या विरुद्ध निकाल पाहायला मिळाला. त्यामुळे क्रीडाप्रेमींची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 58 व्या षटकात खराब पंचगिरीचा नमुना पाहायला मिळाला. कर्णधार रोहित शर्माने आर अश्विनकडे गोलंदाजी सोपवली होती. तिसऱ्या चेंडूवर मिचेल मार्शच्या पायावर चेंडू आदळला आणि जोरदार अपील करण्यात आलं. पण ऑनफिल्ड पंच रिचर्ड इलिंगवर्थने बाद दिला नाही. भारतीय संघाने तात्काळ डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. रिप्लेत पाहिल्यानंतर चेंडू बॅटच्या खूपच जवळ असल्याचं दिसलं. थर्ड अंपायर असलेले आणि भारतासाठी काय अनलकी ठरलेल्या रिचर्ड कॅटलबोरोने फिल्ड पंचांचा निर्णय कायम ठेवला. तसेच चेंडू बॅटवर आधी आदळला की पॅडवर याचं काहीच प्रमामण नाही असं निरीक्षण नोंदवलं.

दुसऱ्या रिप्लेत पाहिल्यानंतर दूध का दूध पानी का पानी झालं. चेंडू पहिल्यांदा पॅडवर आदळल्याचं दिसलं. पण मिचेल मार्शला आऊट दिलं नसतं कारण अंपायर्स कॉल असता. पण हे सर्व मान्य केलं असलं तरी टीम इंडियाला वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित होतो. पर्थ कसोटीत केएल राहुलला असंच आऊट दिलं होतं. तेव्हा चेंडू पहिल्यांदा बॅटवर आदळला की पॅडवर याबाबत संभ्रम होता. तेव्हा तिसऱ्या पंचांनी फिल्ड पंचांना निर्णय बदलून आऊट दिलं होतं. पर्थमध्ये रिचर्ड इलिंगवर्थ तिसरे पंच होते. तर फिल्डवर रिचर्ड कॅटलबोरो होते. आता एडिलेडमध्ये रिचर्ड कॅटलबोरो तिसरे पंच, तर रिचर्ड इलिंगवर्थ फिल्ड पंच होते.

मिचेल मार्शला जीवदा मिळालं. पण भारताला आपला एक रिव्ह्यू गमवण्याची वेळ आली. इतकंच काय तर ब्रॉडकास्टरने क्लोज व्ह्यू दाखवल्यानंतर समालोचक संतापले. त्याने बॉल ट्रॅकिंग का पाहिलं नाही असा प्रश्न उपस्थित केला. कारण हा इम्पॅक्ट अम्पायर कॉल होता. चेंडू स्टंपवर जात होता. असं केलं असतं तर भारताचा रिव्ह्यू वाचला असता.