IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीज दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या आईच निधन

| Updated on: Mar 10, 2023 | 10:28 AM

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या आईची दुर्धर आजाराशी सुरु होती झुंज. सध्या बॉर्डर-गावस्कर सीरीज दरम्यान भारत-ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील चौथा अखेरचा कसोटी सामना सुरु आहे.

IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीज दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या आईच निधन
Australian Team
Image Credit source: GETTY IMAGES
Follow us on

IND vs AUS Test : भारत दौरा अर्ध्यावर सोडून ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स मायदेशी परतला होता. पॅट कमिन्सची आई आजारी होती. म्हणून त्याला मायदेशी परताव लागलं होतं. शुक्रवारी सकाळी कमिन्सच्या आईने अखेरचा श्वास घेतला. अखेरच्या दिवसात आई मारियासोबत वेळ घालवण्यासाठी पॅट कमिन्स दिल्ली कसोटीनंतर मायदेशी परतला होता. भारताविरुद्ध अहमदाबाद येथे चौथा कसोटी सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमने मारिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू दंडावर काळपट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स यांच्या आईच्या निधनाची माहिती देताना संवेदना व्यक्त केली आहे. मारिया कमिन्स यांच्या निधनामुळे आम्ही सर्व दु:खी आहोत, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया कमिन्स आणि त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. ऑस्ट्रेलियन टीम काळी पट्टी बांधून मैदानात उतरेल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे.


काय आजार होता?

पॅट कमिन्सची आई बऱ्याच काळापासून आजारी होती. 2005 मध्ये पहिल्यांदा त्यांच्या ब्रेस्ट कॅन्सरच निदान झालं. मागच्या काही आठवड्यांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. बीसीसीआयने सुद्धा शोक व्यक्त करताना, या कठीण प्रसंगात आम्ही कमिन्स कुटुंबासोबत आहोत असं म्हटलं आहे.

भारत दौऱ्यात कमिन्सची कामगिरी कशी आहे?

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन कसोटी सामने गमावले. ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटीत पुनरागमन केलं. त्यांनी विजय मिळवला. भारत बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. कमिन्सने पहिल्या कसोटीत 7 धावा करुन 2 विकेट घेतल्या. दुसऱ्या कसोटीत त्याने 33 धावा केल्या व एक विकेट घेतला.