
वैभव सूर्यवंशीकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहीलं जात आहे. वैभव सूर्यवंशी अल्पावधीत आणि कमी वयात नावलौकिक मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या फलंदाजीचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना त्याने सळो की पळो करून सोडलं. त्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय सोपा झाला. भारताने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 58 धावांनी पराभूत केलं. या विजयासह वैभव सूर्यवंशीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमधील पहिल्या डावात 243 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने आक्रमक सुरुवात करून दिली. वैभवने 86 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकार मारत 113 धावा केल्या. तर मधल्या फळीत वेदांत त्रिवेदीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर सावध आणि महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 192 चेंडूंचा सामना करत 140 धावा काढल्या. वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक खेळीने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात 9 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याने अवघ्या 78 चेंडूत शतक पूर्ण केलं. यासह ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोणत्याही फलंदाजाने केलेलं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. या शतकी खेळीसह त्याने षटकारांचा विक्रमही नावावर केला आहे. युथ टेस्टमध्ये सर्वाधिक 13 षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॉर्ज बार्टलेटच्या नावावर होता. पण आता वैभव सूर्यवंशी 15 षटकार मारत त्याचा विक्रम मोडला आहे. तर भारतासाठी युथ कसोटीत एका डावात सर्वाधिक 8 षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम आधी हरवंश पंगालियाच्या नावावर होता. त्याने एका डावात 6 षटकार मारले होते.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 243 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताने सर्व गडी गमवून 428 धावा केल्या. यासह भारताने पहिल्या डावात 185 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला ही आघाडी मोडून काढणं कठीण झालं. भारताने ऑस्ट्रेलियाला अवघ्या 127 धावांवर रोखलं. दीपेश देवेंद्रनने 3, खिलान पटेलने 3, अनमोलजीत सिंगने 2 आणि किशन कुमारने 2 गडी बाद केले. भारताने हा सामना 58 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.