Bcci : भारतीय महिला संघाची आगामी मालिका स्थगित! बीसीसीआयचा मोठा निर्णय

Bcci : भारत विरुद्ध बांगलादेश वूमन्स टीम यांच्यात वनडे आणि टी 20 असे एकूण 6 सामने नियोजित होते. मात्र आता बांगलादेशचा भारत दौरा स्थगित करण्यात आला आहे. जाणून घ्या

Bcci : भारतीय महिला संघाची आगामी मालिका स्थगित! बीसीसीआयचा मोठा निर्णय
India vs Bangladesh Womens Cricket
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 18, 2025 | 6:41 PM

वूमन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फायनलमध्ये धुव्वा उडवत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. महिला ब्रिगेडने या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी भारताच्या वाघिणींचं अभिनंदन केलं. त्यानंतर खेळाडू आपल्या घरी परतले. तिथेही या खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. सध्या वूमन्स टीम इंडिया विश्रांतीवर आहे. वूमन्स टीम इंडिया डिसेंबर महिन्यात वर्ल्ड कपनंतर मैदानात उतरणार होती. मात्र त्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने वूमन्स टीम इंडियाची पुढील मालिका स्थगित केली आहे. बीसीसीआयने प्रतिस्पर्धी संघाच्या क्रिकेट बोर्डाला याबाबतची पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

वूमन्स इंडिया-बांगलादेश मालिका स्थगित!

बीसीसीआयने भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील नियोजित मालिका पुढे ढकलली आहे. बांगलादेश वूमन्स टीम भारत दौऱ्यावर येणार होती. बांगलादेश या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध वनडे आणि टी 20I अशा 2 मालिका खेळणार होती. भारत विरुद्ध बांगलादेश वूमन्स यांच्यात दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने नियोजित होते.

आम्हाला बीसीसीआयकडून पत्र मिळालं असल्याचं बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे, असा दावा ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्याआधीच या दोन्ही संघात 2 मालिका नियोजित होत्या. मात्र आता दोन्ही संघ इतक्यात भिडणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

बांगलादेशचा भारत दौरा स्थगित करण्याचं कारण काय?

बांगलादेशमधील राजकीय स्थितीमुळे हा दौरा स्थगित करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान काही महिन्यांआधी टीम इंडियाचा बांगलादेश दौरा स्थगित करण्यात आला होता. टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांगलादेश विरुद्ध वनडे आणि टी 20I मालिका खेळणार होती. मात्र दोन्ही क्रिकेट बोर्डांनी संमतीने हा दौरा 1 वर्षासाठी स्थगित केला आहे. त्यामुळे हा दौरा आता सप्टेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.