IND vs ENG : इंग्लंडमध्ये ऋषभ पंत-केएल राहुल दोघांपैकी कोणता विकेटकीपर बॅट्समन सरस?

KL Rahul vs Rishabh Pant : केएल राहुल आणि नवनियुक्त उपकर्णधार विकेटकीपर ऋषभ पंत या दोघांनी इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकटेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. या दोघांची इंग्लंडमध्ये कामगिरी कशी राहिलीय? जाणून घ्या.

IND vs ENG : इंग्लंडमध्ये ऋषभ पंत-केएल राहुल दोघांपैकी कोणता विकेटकीपर बॅट्समन सरस?
Rishabh Pant and KL Rahul
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 16, 2025 | 2:54 PM

टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी जवळपास तयारी पूर्ण झाली आहे. टीम इंडियाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कसून सराव केला आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात विजयी सलामी देण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन या 3 अनुभवी खेळाडूंशिवाय टीम इंडिया पहिल्यांदा खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कस लागणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंकडे स्वत:ला सिद्ध करण्यासह स्वत:च स्थान भक्कम करण्याची संधीही आहे. टीम इंडियातील काही खेळाडूंचा हा पहिलाच इंग्लंड दौरा आहे. तर काही खेळाडूंना इंग्लंड दौऱ्याचा अनुभव आहे. त्यात केएल राहुल आणि ऋषभ पंत या विकेटकीपर फलंदाज जोडीचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.

टीम इंडियाला इंग्लंडमध्ये 18 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकायची असेल तर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंड दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केलीय. मात्र फलंदाज काही वेळा अपयशी ठरलेत. त्यामुळे गिलसमोर स्वत:ला कॅप्टन्सीसह फलंदाज म्हणून सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे.

गिल व्यतिरिक्त ऋषभ पंत आणि केएल राहुल या दोघांकडून क्रिकेट चाहत्यांना खूप आशा आहेत. त्यामागचं कारणही तसंच आहे. या दोघांनाही इंग्लंडमधील परिस्थितीत फक्त खेळण्याचाच नाही तर यजमानांना बॅटने ठोकून काढण्याचाही अनुभव आहे. त्यामुळे या दोघांकडून आशा वाढल्या आहेत. या दोघांची इंग्लंडमधील टेस्ट क्रिकेटमधील कामगिरी कशी राहिलीय? दोघांपैकी सरस कोण राहिलाय? हे जाणून घेऊयात.

केएल आणि ऋषभची आकडेवारी

केएल आणि ऋषभ या दोघांची इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी जवळपास सारखीच आहे. पंतने इंग्लंडमध्ये 8 सामने खेळले आहेत. पंतने या 8 सामन्यांमधील 15 डावात 34.06 च्या सरासरीने 511 धावा केल्या आहेत. पंतने या दरम्यान 2 शतकं आणि तितकीच अर्धशतकं झळकावली आहेत. पंतने 70. 19 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत.

केएल राहुल याने इंग्लंडमध्ये 9 कसोटी सामने खेळले आहेत. केएलने 9 सामन्यांमधील 18 डावांत 34.11 च्या सरासरीने 614 धावा केल्या आहेत. केएलने इंग्लंडमध्ये 2 शतकं आणि 1 अर्धशतक केलं आहे. केएलचा इंग्लंडमधील स्ट्राईक रेट हा 51.81 इतका आहे. त्यामुळे आता केएल आणि पंत या दोघांनीही त्यांच्या आकडेवारीला साजेशी कामगिरी करावी, इतकीच आशा चाहत्यांना असणार आहे.