Odi Series : 1 मालिका आणि 3 सामने, 10 जानेवारीपासून वनडे सीरिज, टीम इंडिया सज्ज, पहिला सामना कुठे?

Team India Odi Series : टीम इंडिया नववर्षातील पहिली एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. जाणून घ्या वूमन्स टीम इंडियाच्या मायदेशातील मालिकेचं वेळापत्रक.

Odi Series : 1 मालिका आणि 3 सामने, 10 जानेवारीपासून वनडे सीरिज, टीम इंडिया सज्ज, पहिला सामना कुठे?
Saurashtra Cricket Association Stadium Rajkot
Image Credit source: Bcci
| Updated on: Jan 05, 2025 | 8:48 PM

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला सिडनीत झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी 6 विकेट्सने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने यासह तब्बल 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी उंचावली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता मेन्स टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही 22 जानेवारीपासून टी 20i मालिकेने होणार आहे. या मालिकेला जवळपास 3 आठवड्यांचा अवधी बाकी आहे. क्रिकेट चाहत्यांना या दरम्यान वूमन्स इंडिया क्रिकेट टीमचे सामने पाहायला मिळणार आहेत.

वूमन्स टीम इंडिया नववर्षात मायदेशात पहिलीच आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध भिडणार आहे. आयर्लंड या दौऱ्यात फक्त एकदिवसीय मालिकाच खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेचं आयोजन हे 10 ते 15 जानेवारीदरम्यान करण्यात आलं आहे. हे सामने आयसीसी चॅम्पियन्शीप अंतर्गंत खेळवण्यात येणार आहेत. तसेच तिन्ही सामने हे एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहे. तिन्ही सामने हे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम, राजकोट येथे होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना सरावासाठी अधिक वेळ मिळणार, हे निश्चित आहे. या तिन्ही सामन्यांना सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

भारतीय संघाची घोषणा केव्हा?

दरम्यान या मालिकेला आता अवघे काही तास बाकी आहेत. मात्र अजूनही भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये संघ जाहीर होईल. यात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, पहिला सामना, शुक्रवार 10 जानेवारी,

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, दुसरा सामना, रविवार 12 जानेवारी,

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, तिसरा सामना, बुधवार 15 जानेवारी

दरम्यान आयर्लंड वूमन्स टीम भारत दौऱ्यावर येणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला आयर्लंड मेन्स टीम झिंबाब्वे दौरा करणार आहेत. आयर्लंड मेन्स टीम झिंबाब्वे दौऱ्यात एकमेव कसोटी, वनडे आणि टी 20i मालिका खेळणार आहे. आयर्लंडच्या झिंबाब्वे दौऱ्याचं आयोजन हे 6 ते 25 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे.