
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा बुधवारपासून बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याच्याबाबत आलेल्या अपडेटमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. शुबमन गिल पहिल्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमनला मानेला आणि खांद्याला त्रास असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिलने त्याला होत असलेल्या त्रासाबाबत टीम मॅनेजमेंटला कळवलं आहे. आता शुबमन गिल खेळणार की नाही? याबाबत बुधवारी अर्थात सामन्याच्याच दिवशी स्पष्ट होईल. शुबम गिल टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. शुबमन सध्या तिसऱ्या स्थानी खेळतोय. शुबमनने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीत नाबाद 119 धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत शुबमनने 39 धावा केल्या होत्या. भारताने हा दुसरा सामना अवघ्या 2 दिवसातच जिंकला होता.
दरम्यान कॅप्टन रोहित शर्मा याने सामन्याआधी पत्रकार परिषदेत प्लेइंग ईलेव्हनबाबत प्रतिक्रिया दिली. प्लेइंग ईलेव्हनबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. आमची प्लेइंग ईलेव्हन ही परिस्थितीनुसार असेल, असं रोहितने म्हटलं. बंगळुरुत मंगळवारी पाऊस झाल्याने खेळपट्टी झाकण्यात आली आहे. आम्ही बुधवारी गोलंदाज आणि सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय करु, असंही रोहितने नमूद केलं.
आता शुबमन खेळणार की नाही? त्याला दुखापत आहे की नाही? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र शुबमनला पहिल्या सामन्यात मुकावं लागलं, तर त्याच्या जागी मुंबईकर सर्फराज खान याला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता नक्की काय निर्णय होतो? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
पहिला सामना, 16 ते 20 ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, पुणे
तिसरा सामना, 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.