
न्यूझीलंडला श्रीलंका दौऱ्यात 0-2 ने कसोटी मालिका गमवावी लागली. मात्र न्यूझीलंडवर भारत दौऱ्यात या पराभवाचा कोणताच नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला नाही. न्यूझीलंडने टीम इंडिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. भारताने विजयासाठी दिलेलं 107 धावांचं आव्हान न्यूझीलंडने 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
न्यूझीलंडसाठी हा विजय ऐतिहासिक असा ठरला. न्यूझीलंडने तब्बल 36 वर्षांनी भारतात कसोटी विजय मिळवला. न्यूझीलंडंने याआधी 1969 आणि 1988 साली विजय मिळवला होता. न्यूझीलंडने या विजयास 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता भारताला मायदेशात कसोटी मालिका गमवायची नसेल, तर उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
टॉम लॅथमच्या नेतृत्वात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. त्यामुळे न्यूझीलंडच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर निशाणा साधत त्याचं काय चुकंल? याबाबत सांगितलं.
“सर्वात आधी तर आम्ही टॉस गमावला ते बरं झालं, कारण मला वाटत होतं की पहिले फलंदाजी करावी लागेल. आमच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात अचूक बॉलिंग केली आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यामुळे आम्हाला विजयी होता आलं. टीम इंडिया कधीही आणि कुठूनही कमबॅक करु शकते हे आम्हाला माहित होतं. दुसऱ्या डावात जेव्हा नवा चेंडू घेतला गेला तेव्हा आमच्या गोलंदाजांना लय सापडली आणि आम्ही कमबॅक केलं. तसेच नव्या बॉलने टीम इंडियालाही मदत मिळेल हे आम्हाला माहित होतं. मात्र मी आभारी आहे की आम्हाला 100 च्या आसपासच आव्हान मिळालं”, असं टॉमने म्हटलं.
कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हाच निर्णय भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला कारण टीम इंडियाचा पहिला डाव हा अवघ्या 46 धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 402 धावा तेल्या. टीम इंडियाने 356 धावांच्या प्रत्युत्तरात 462 धावा केल्याने न्यूझीलंडला 107 धावांचं आव्हान मिळालं. पाहुण्यांनी हे आव्हान सहज पूर्ण करत विजय मिळवला.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.