
टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Odi Series 2026) यांच्यात 11 ते 18 जानेवारी दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही संघ 2026 वर्षातील आपला पहिला आणि एकदिवसीय सामना हा रविवारी 11 जानेवारीला बडोदातील कोटांबी स्टेडियममध्ये (BCA Stadium, Kotambi) खेळणार आहेत. कोटांबी स्टेडियममध्ये होणारा हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याला बीसीसीआय आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या सामन्यातून 24 वर्षीय युवा आणि वेगवान गोलंदाज एकदिवसीय पदार्पण करणार असल्याचं निश्चित आहे. याबाबतची माहिती स्वत: कर्णधाराने पत्रकार परिषदेदरम्यान दिली. तो 24 वर्षीय गोलंदाज कोण आहे? हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचं टीम इंडिया विरुद्ध पदार्पण होणार आहे. हा गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे. ख्रिस्टीयन क्लार्क असं या न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचं नाव आहे. क्लार्कचा याआधी कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. मात्र तेव्हा त्याला प्लेइंग ईलेवहनमध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मायकल ब्रेसवेल यानेच क्लार्क बडोद्यात पदार्पण करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
“आम्ही प्लेइंग ईलेव्हन निश्चित केलेली नाही. मात्र क्लार्क रविवारी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणार असल्याचं निश्चित आहे. क्लार्कसाठी ही चांगली संधी आहे. क्लार्कने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि इथवरच्या तयारीपर्यंत चांगली बॉलिंग केली आहे”, असं मायकल ब्रेसवेल याने नमूद केलं.
क्लार्कने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्लार्कने आतापर्यंत 28 फर्स्ट क्लास आणि 34 लिस्ट ए सामने खेळले आहेत. क्लार्कने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 79 तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 52 विकेट्स मिळवल्या आहेत. विशेष म्हणजे क्लार्कने लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. त्यामुळे क्लार्क बॉलिंगसह बॅटिंगनेही योगदान देऊ शकतो.
दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होणार आहे. उभयसंघातील सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार या एपद्वारे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना मोबाईल आणि लॅपटॉपद्वारे पाहता येईल.