IND vs PAK T20 World Cup: टीम इंडियाला विजयासाठी 160 धावांच टार्गेट

IND vs PAK T20 World Cup: टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) टी 20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) सामना सुरु आहे. ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात 1 लाख प्रेक्षकांच्या साक्षीने ही मॅच सुरु आहे.

IND vs PAK T20 World Cup: टीम इंडियाला विजयासाठी 160 धावांच टार्गेट
ind vs pak
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 23, 2022 | 3:41 PM

मेलबर्न: टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) टी 20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) सामना सुरु आहे. ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात 1 लाख प्रेक्षकांच्या साक्षीने ही मॅच सुरु आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीची संधी दिली.

अर्शदीपने पाकची वाट लावली

टीम इंडियाकडून आज भारतीय बॉलर्सनी चांगली सुरुवात केली. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमला भोपळाही फोडू न देता पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. अर्शदीपने दुसऱ्याच ओव्हरमध्ये बाबरला बाद केलं. त्यानंतर चौथ्या षटकात मोहम्मद रिजवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. रिझवानने फक्त 4 धावा केल्या.

अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर हल्लाबोल

चार ओव्हरमध्ये 15 धावात पाकिस्तानचे दोन प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर शान मसूद आणि इफ्तिखार अहमदने डाव सावरला. त्यांनी सावध फलंदाजी केली. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी 76 धावांची भागीदारी केली. इफ्तिखारने अर्धशतक झळकावताच मोहम्मद शमीने त्याला पायचीत पकडलं. 34 चेंडूत त्याने 51 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 4 षटकार होते. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्याने हल्लाबोल केला.

शान मसूदने किल्ला लढवला

इफ्तिखार बाद झाल्यानंतर पाकिस्तानची मधली फळी कोसळली. दुसऱ्याबाजूने शान मसूद मात्र किल्ला लढवत होता. त्याने 42 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. यात पाच चौकार होते. 16 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या नियंत्रणात होती. पण अखेरच्या ओव्हर्समध्ये शान मसूद आणि शाहीन शाह आफ्रिदीने फटकेबाजी केली. त्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या 160 पर्यंत पोहोचली.

पंड्या-अर्शदीपचा भेदक मारा

भारताकडून अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या यशस्वी गोलंदाज ठरले. दोघांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वरने प्रत्येकी एक विकेट घेतला. पाकिस्तानने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 159 धावा केल्या.