Icc : रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यात कडवी झुंज, आयसीसी घेणार महत्त्वाचा निर्णय, क्रिकेट चाहत्यांचं लक्ष

Rohit Sharma vs Virat Kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी भारतीय फलंदाजांनी मायदेशातील एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला आपली ताकद दाखवून दिली. दोघांनी चाबूक बॅटिंग केली. त्यामुळे आता रोहित आणि विराट यांच्याबाबत आयसीसी निर्णय घेणार आहे.

Icc : रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यात कडवी झुंज, आयसीसी घेणार महत्त्वाचा निर्णय, क्रिकेट चाहत्यांचं लक्ष
Virat Kohli and Rohit Sharma Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 09, 2025 | 7:38 PM

टीम इंडियाने मायदेशात केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 ने मात केली. केएल राहुल याच्या नेतृत्वात टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याची ही एकूण आणि सलग दुसरी वेळ ठरली. भारताला ही मालिका जिंकून देण्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. विराटने या मालिकेत सलग 2 शतक आणि 1 अर्धशतकासह 300 पेक्षा अधिक धावा केल्या. तर रोहितनेही चमकदार कामगिरी करत धावा जोडल्या. दोघांनीही क्रिकेट चाहत्यांनी मनं जिंकत पैसावसूल कामगिरी करुन दाखवली. त्यामुळे आता रोहित आणि विराट यांच्यात एका बाबतीत चढाओढ पाहायला मिळत आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची कामगिरी कशी?

रोहितने 3 सामन्यांमध्ये 48.66 च्या सरासरीने 146 धावा केल्या. रोहितने या दरम्यान 2 अर्धशतकं झळकावली. रोहितने स्फोटक खेळी करुन टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. तर विराटने तब्बल 150 पेक्षा अधिकच्या सरासरीने 302 धावा करत कहर केला. विराटने 2 शतक आणि 1 अर्धशतक ठोकत कमाल केली. भारताच्या या दोन्ही अनुभवी फलंदाजांची कामगिरी पाहून क्रिकेट चाहते सुखावले.

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण होणार नंबर 1? रोहित-विराटमध्ये चुरस

या दोघांच्या कामगिरीमुळे आता आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 कोण ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. रोहित वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर विराट चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या खात्यात 783 तर विराटच्या खात्यात 738 रेटिंग पॉइंट्स आहेत. विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीचा फायदा रँकिंगमध्ये होणं अपेक्षित आहे. विराट नंबर 1 होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता रोहित पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरणार की विराट बाजी मारणार? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.

आयसीसी बुधवारी करणार घोषणा

दरम्यान आता 10 डिसेंबरला आयसीसीकडून वनडे रँकिंग जाहीर करण्यात येणार आहे. या रँकिंगमध्ये विराट कोहली याला किती स्थानांचा फायदा होतो? तसेच हिटमॅन रोहित सिंहासन कायम राखण्यात यशस्वी ठरणार का? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे.