Shafali Verma : लेडी सेहवागचा श्रीलंकेविरुद्ध तडाखा, शफाली वर्मा हीची अर्धशतकांची हॅटट्रिक

Shafali Verma Fifty Hat Trick IND vs SL 4th T20i : शफाली वर्मा हीने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात विस्फोटक आणि विंध्वसक खेळी केली. शफालीने यासह अर्धशतकांची हॅटट्रिक पूर्ण केली.

Shafali Verma : लेडी सेहवागचा श्रीलंकेविरुद्ध तडाखा, शफाली वर्मा हीची अर्धशतकांची हॅटट्रिक
Shafali Verma Fifty
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Dec 28, 2025 | 8:40 PM

वूमन्स टीम इंडियाची लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीने श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत तडाखा कायम ठेवला आहे. शफालीने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात तिरुवनंतरपुरममध्ये वादळी अर्धशतक झळकावलं आहे. शफालीने यासह या मालिकेत एकूण आणि सलग तिसरं अर्धशतक ठोकलं आहे. शफालीच्या टी 20i कारकीर्दीतील हे 12 वं अर्धशतक ठरलं.  शफालीने या खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. तसेच दुसऱ्या बाजूने शफालीची ओपनिंग पार्टनर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीनेही टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली.

शफालीला या मालिकेतील सलामीच्या सामन्यात काही खास करता आलं नाही. शफाली दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरली. मात्र शफालीला दुसर्‍या सामन्यानंतर सूर गवसला. शफालीने आपली ताकद दाखवत सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. शफालीने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना अर्धशतक झळकावलं आणि भारताच्या विजयात योगदान दिलं.

शफालीची अर्धशतकी हॅटट्रिक

श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यानंतर टीम इंडियाकडून शफाली आणि स्मृती ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघींनी सुरुवातीपासूनच टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना बॅकफुटवर टाकलं. शफालीने चौकारांची बरसात केली. शफालीने 11 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर फोर ठोकला. शफालीने यासह अवघ्या 30 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं. शफालीने या खेळीत 9 चौकार ठोकले.

शफाली वर्मा तिसरी महिला भारतीय क्रिकेटर

दरम्यान शफालीने यासह खास यादीत स्थान मिळवलं. शफाली टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सलग 3 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा 50 प्लस रन्स करणारी तिसरी फलंदाज ठरली. शफालीआधी मिताली राज आणि स्मृती मंधाना या दोघींनी संयुक्तरित्या सलग 4 वेळा अर्धशतक झळकावलं आहे.

शफालीचं 12 वं टी 20i शतक

शफालीला मिताली आणि स्मृतीच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

मिताली राज हीने 2016 ते 2018 दरम्यान सलग 4 टी 20i अर्धशतकं केली होती. भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हीने 2024-2025 दरम्यान हा कारनामा करत मितालीच्या विक्रमाची बरोबरी साधली होती. त्यानंतर आता शफालीने ही कामगिरी केली आहे. आता शफालीला या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात अर्धशतक करत मिताली राज आणि स्मृती मंधाना या दोघींच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.