
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताला प्रथम गोलंदाजी करणं भाग पडलं. भारताने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलं आणि वेस्ट इंडिजला बॅकफूटवर ढकललं. त्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव पहिल्याच दिवशी गडगडला. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 162 धावा केल्या. त्यामुळे भारताला आता पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजची स्थिती नाजूक झाल्याने भारताच्या विजयाच्या आशा देखील दुप्पट झाल्या आहेत. आता भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. भारताची बॅटिंग लाइन अपमध्ये खूप खोली आहे. त्यामुळे आरामात मोठी धावसंख्या उभारेल असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. त्यात होम ग्राउंडचा भारतीय फलंदाजांना फायदा होईल हे नव्याने काही सांगायची गरज नाही.
वेस्ट इंडिजच्या अवघ्या 12 धावा असताना पहिला धक्का बसला. तेजनारायण चंद्रपॉलला खातंही खोलता आलं नाही. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर विकेटकीपर ध्रुव जुरेलने त्याला झेल पकडला. त्यानंतर जॉन कॅम्पबेल 8 धावा करत तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ठरावीक अंतराने धडाधड विकेट पडण्यास सुरुवात झाली. लंच ब्रेकपर्यंत निम्म्याहून अधिक संघ तंबूत होता. तिसरी विकेट 39 धावांवर पडली. ब्रँडन किंग बाद झाला. त्यानंतर एलिक अथानाझेची विकेट 42 धावांवर पडली. तर शाई होप 26 धावा करून तंबूत परतला. तेव्हा वेस्ट इंडिजच्या 90 धावा होत्या. रोस्टन चेस 24 धावा करून बाद झाला.
टी ब्रेकनंतर वेस्ट इंडिजला वॉशिंग्टन सुंदरने धक्का दिला. त्याने सातवी विकेट काढली. जसप्रीत बुमराहने दोन षटकात दोन धक्के दिले. जस्टीन ग्रीव्ह्सला बाद केल्यानंतर जोहान लेनचा त्रिफळा उडवला. या सामन्यात मोहम्मद सिराजला पाच विकेट घेण्याची संधी होती. पण ते काही झालं नाही. कुलदीप यादवने शेवटची विकेट काढली आणि सिराजच्या पाच विकेटच्या आशेला ब्रेक लागला. मोहम्मद सिराजने 14 षटकात 3 षटकं निर्धाव टाकली आणि 40 धावा देत 4 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने 14 षटकात 3 निर्धाव षटकं टाकत 42 धावा देत 3 गडी बाद केले. तर कुलदीप यादवने 2 गडी आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 गडी बाद केला.