IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकणं महत्त्वाचं, कारण की…

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना ओव्हल मैदानात होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. असं असताना नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा आहे.

IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकणं महत्त्वाचं, कारण की...
पाचव्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकणं महत्त्वाचं, कारण की...
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 30, 2025 | 3:37 PM

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामने पार पडले आहेत. या मालिकेतील चौथा सामना ड्रॉ झाल्यानंतर मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. इंग्लंडने चार सामन्यानंतर आघाडीवर आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात भारताला काहीही करून विजय मिळवावा लागेल. कारण हा सामना ड्रॉ किंवा इंग्लंडने जिंकला तर मालिका त्यांच्या खिशात जाईल. 31 जुलैपासून ओव्हल मैदानात हा सामना सुरु होणार आहे. टीम इंडिया शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्नात आहे. पण या सामन्यात वरुणराजाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. कारण या कसोटी सामन्यातही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचा राहील. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात कर्णधार शुबमन गिलच्या पदरी अपयश पडलं आहे. एकदाही नाणेफेकीचा कौल बाजूने लागला नाही. पण पाचव्या सामन्यात नाणेकैकीचा कौल खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.

पहिल्या दिवशी ओव्हलवर 20 टक्के पावसाची शक्यता असणार आहे. आकाश ढगाळ असेल, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना खूप मदत होईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. या दिवशी तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हे दोन दिवस फलंदाजांसाठी चांगले असतील. चौथ्या दिवशीही हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. शेवटच्या दिवशी पुन्हा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला धावांचा पाठलाग करणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे सामन्यात नाणेफेक जिंकणे खूप महत्त्वाचं आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल.

पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ही खेळपट्टी फलंदाजांच्या बाजूने बदलेल. ओव्हलची खेळपट्टी पहिल्या दोन दिवसांत वेगवान गोलंदाजांना मदत करते, तसेच उसळी मिळते. सामना जसजसा पुढे सरकतो तसतसे खेळपट्टीवर भेगा दिसू लागतात. यामुळे फिरकी गोलंदाजांना खूप मदत होते. अलिकडच्या कसोटी सामन्यांमध्ये ओव्हलमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 350-400 च्या दरम्यान आहे.

या खेळपट्टीवर आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 8 वेळा विजय मिळवला आहे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांनी 6 वेळा विजय मिळवला आहे. तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. 2021 मध्ये इंग्लंडने या मैदानावर टीम इंडियाचा 157 धावांनी पराभव केला होता. पण आता पावसाची स्थिती पाहता प्रथम गोलंदाजी करणं सोयीचं ठरेल.