
मेलबर्न: अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानवर (IND vs PAK) 4 विकेट राखून विजय मिळवला. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची जशी अपेक्षा असते, अगदी तसाच हा सामना झाला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना होता. विराट कोहली (Virat Kohli) या विजयाचा हिरो ठरला. त्याने हरलेली मॅच टीम इंडियाला जिंकून दिली. विराटने या मॅचमध्ये 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 4 षटकार होते.
या विजयाच सर्व श्रेय विराटला
ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात आज पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सामना झाला. या मॅचपासूनच दोन्ही टीम्सनी आपल्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात केली आहे. टीम इंडियाने मिळवलेलला विजय खरोखर कौतुकास्पद आहे. या विजयाच सर्व श्रेय विराट कोहलीला जातं. त्याला हार्दिक पंड्याने चांगली साथ दिली. पाकिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 159 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन विजयावर शिक्कामोर्तब केलं.
टीम इंडियाची सुरुवात खूपच निराशाजनक
पाकिस्तानने विजयासाठी 159 धावांच लक्ष्य दिलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली होती. 31 धावात टीम इंडियाने चार विकेट गमावले होते. केएल राहुल (4), रोहित शर्मा (4) ही सलामीवीरांची जोडी 10 धावात तंबुत परतली.
हार्दिकची मोलाची साथ
त्यानंतर सूर्यकुमार यादव (15) आणि अक्षर पटेल (2) धावात तंबुत परतले. टीम इंडियाचा पराभव दिसत होता. त्यावेळी क्रीजवर आलेल्या हार्दिक पंड्याने विराट कोहलीला साथ दिली. दोघांनी एकेरी-दुहेरी धावा पळून काढल्या. खराब चेंडूंवर चौकार-षटकार लगावले. हार्दिकने 37 चेंडूत 40 धावा केल्या. यात 1 चौकार आणि 2 षटकार होते. त्याने विराट सोबत 113 धावांची शतकी भागीदारी केली. या पार्टनरशिपमुळे टीम इंडिया मॅचमध्ये आली. विराटने डेथ ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने हा सामना जिंकला.
पंड्या-अर्शदीपचा भेदक मारा
भारताकडून अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या यशस्वी गोलंदाज ठरले. दोघांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वरने प्रत्येकी एक विकेट घेतला. पाकिस्तानने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 159 धावा केल्या.