India vs South Africa : पाच शब्द, दोन फोटो अन्… टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट, टॅटूची झलकही समोर

विश्वचषक विजयानंतर तिचा होणारा नवरा, संगीतकार पलाश मुच्छलने तिच्यासोबतचे खास फोटो शेअर करत तिच्या आणि संघाच्या यशाचे कौतुक केले. स्मृती आणि पलाश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

India vs South Africa : पाच शब्द, दोन फोटो अन्... टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट, टॅटूची झलकही समोर
Smriti Mandhana Palash Muchhal
| Updated on: Nov 03, 2025 | 11:19 AM

सध्या भारतात दिवाळीनंतरची दिवाळी साजरी होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. भारतीय महिला संघाने प्रथमच महिला एकदिवसीय विश्वचषकांचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करत विजेतेपदावर नाव कोरले. भारताने दिलेल्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांत आटोपला. यानंतर अखेर भारतीय महिला संघाने इतिहासात पहिल्यांदाच वन-डे वर्ल्ड कप उंचावला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली आणि कोच अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने हा धमाकेदार विजय मिळवला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या अंतिम सामन्यात सांगलीची मराठमोळी क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने ५८ चेंडूंत आठ चौकारांसह ४५ धावा केल्या. तर शेफालीने स्मृती मानधनासह पॉवरप्लेमध्ये १०४ धावांची सलामी भागीदारी केली. त्यामुळे भारताची खेळी सोपी झाली. आता या विजयानंतर भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. स्मृती मानधनाने वर्ल्डकप उंचावल्यानंतर तिचा होणारा नवरा पलाश मुच्छलने दोन खास पोस्ट शेअर केल्या आहे.

पलाश मुच्छलची पोस्ट

पलाश मुच्छलने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये पलाशने त्याच्या हातात विश्वचषक धरत स्मृतीच्या चेहऱ्यावरील आनंद टिपण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “सबसे आगे है हम हिंदुस्तानी” अशा पाच शब्दात त्याने स्मृतीसह भारतीय महिला संघाचे कौतुक केले आहे.

विशेष म्हणजे या फोटोत पलाशने काही वर्षांपूर्वी हातावर काढलेला टॅटूही दिसत आहे. यात SM18 म्हणजे स्मृती मानधना आणि तिचा जर्सी नंबर 18 हा गोंदवल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये पलाशने स्मृतीसोबत मैदानातील फोटो शेअर केला आहे. यात स्मृती ही हातात वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. “मला अजूनही हे स्वप्नच वाटत आहे”, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. त्याच्या या दोन्हीही पोस्टवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान सांगलीची मराठमोळी क्रिकेटपटू स्मृती मानधना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत स्मृती लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या दोघांचा विवाहसोहळा सांगलीत पार पडणार आहे. स्मृती-पलाश यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पलाश आणि स्मृती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जवळपास दोन वर्षांपासून सुरु आहेत. या दोघांनीही यावर कित्येकदा भाष्य करणं टाळलं होतं. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली. पलाश मुच्छल हा प्रख्यात गायिका पलक मुच्छल हिचा भाऊ आहे.