IND vs SL : वन डे मालिकेसाठी श्रीलंकेने खेळली मोठी चाल, मोहम्मद शिराज आणि मलिंगाला टीममध्ये स्थान, जाणून घ्या

टीम इंडियाने यजमान श्रीलंका संघाचा टी-20 मालिकेत 3-0 ने पराभव केला. या मालिकेनंतर आता टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये वन डे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंका संघाने टीम इंडियाची गोची करण्यासाठी मोठी खेळी केली आहे. नेमकी खेळी काय ते जाणून घ्या.

IND vs SL : वन डे मालिकेसाठी श्रीलंकेने खेळली मोठी चाल, मोहम्मद शिराज आणि मलिंगाला टीममध्ये स्थान, जाणून घ्या
team india
Image Credit source: BCCI
| Updated on: Aug 01, 2024 | 5:50 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला उ्दयापासून म्हणजेच 2 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलंबोमध्ये होणार आहे. मालिकेला सुरूवात होण्याआधी श्रीलंकेने मोठा बदल केलेला पाहायला मिळत आहे. तसे पाहायला गेले तर वन डे मालिका तोंडावर असताना श्रीलंकेचे दोन मुख्य वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. त्या दोन्ही खेळाडूंच्या जागी श्रीलंकेच्या टीम मॅनेजमेंटने दोन खेळाडूंची निवड केली आहे. हे दोन खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून मोहम्मद शिराज आणि इशान मलिंगा आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल सिराज आणि मलिंगा श्रीलंका संघाकडून कसे खेळणार? याबाबत जाणून घ्या.

श्रीलंकेचे दोन खंदे गोलंदाज दिलशान मधुशंका आणि मथीशा पाथिराना हे बाहेर झाल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे. टी-20 मालिकेमध्ये दोन्ही गोलंदजांनी आपली ताकद दाखवून देत चमकदार कामगिरी केली होती. पाथिराना याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे तर दिलशान मधुशंका याच्या पायाचे स्नायू खेचले गेलेत. दोघांच्या जागी टीममझध्ये मोहम्मद शिराज आणि इशान मलिंगा यांची निवड करण्यात आली आहे.

कोण आहे मोहम्मद शिराज?

वन डे मालिकेसाठी निवडला गेलेला मोहम्मद शिराज हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. 29 वर्षीय शिराज याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केल्याने त्याची भारताविरूद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झालीये. शिराज याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 47 सामन्यात 80 विकेट घेतल्या आहेत. शिराजला जर मुख्य संघात खेळण्याची संधी मिळाली तर तो टीम इंडियासाठी मोठी डोकदुखी ठरण्याची शक्यता आहे. शिराजकडे नवीन बॉल स्विंग करण्याची कमालीची कला आहे.

 

इशान मलिंगाच्या नावाचीही जोरदार चर्चा होताना दिसत आहे. इशान मलिंगा हा युवा गोलंदाज असून त्याने अवघे सात सामने खेळले आहेत. 27 जुलै रोजी अवघ्या 49 धावांत 5 बळी घेण्याची कामगिरी केल्याने निवड समितीने त्याची निवड केली आहे. आता हे दोन्ही टीमकडून खेळताना कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.