ENG vs IND : आयपीएलनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्ये, शुबमनसेनेचं मिशन ‘टेस्ट सीरिज’

India Tour Of England 2025 : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा थरार 20 जूनपासून रंगणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 साखळीतील पहिली मालिका असणार आहे.

ENG vs IND : आयपीएलनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्ये, शुबमनसेनेचं मिशन टेस्ट सीरिज
Yashasvi Jaiswal and Shubman Gill Team India
Image Credit source: Darrian Traynor/Getty Images
| Updated on: Jun 06, 2025 | 4:58 PM

आयपीएलचा 18 वा मोसम संपला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल ट्रॉफी जिंकून त्यांच्या चाहत्यांची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. त्यानंतर आता रियल क्रिकेट अर्थात कसोटी क्रिकेटचा थरार रंगणार आहे. टीम इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स आमनेसामने आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडिया शुबमन गिल या नवनियुक्त कर्णधारासह इंग्लंडमध्ये पोहचली आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिची सोशल मीडियावरुन दिली आहे. टीम इंडिया इंग्लंडमध्ये एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे.

रोहित शर्मा याच्या कसोटी निवृत्तीनंतर शुबमन गिल याला भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्ये इतिहास घडवण्यासाठी दाखल झाली आहे. कर्णधार म्हणून शुबमन गिलसाठी इंग्लंड दौरा अग्निपरीक्षा असणार आहे. कारण टीम इंडिया पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन या तिघांशिवाय खेळणार आहे. या तिघांनी निवृत्ती घेतली असल्याने आता टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यात ‘कसोटी’ असणार आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

पहिला सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा हेडिंग्ले लीड्स येथे आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंडने 5 जून रोजी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियात विराट आणि रोहितच्या जागी कुणाला संधी मिळणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. मात्र येत्या 10 दिवसांमध्ये टीम इंडियाला विजयी सुरुवात करुन देईल अशी प्लेइंग ईलेव्हन तयार करणार असल्याचा विश्वास शुबमन गिल याने व्यक्त केला आहे.

8 जूनपासून सराव

दरम्यान इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या सराव शिबीराला 8 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी इंग्लंड लायन्स विरूद्ध 1 अनऑफीशियल टेस्ट मॅच खेळली आहे. तर दुसऱ्या अनऑफीशियल टेस्टमध्ये केएल राहुल आणि इतर खेळाडू सहभागी झाले आहेत, ज्यांचा 5 सामन्यांसाठीच्या मुख्य संघात समावेश आहे. त्यामुळे टीम इंडियाला या 2 अनऑफिशीयल टेस्ट मॅचमधील सरावाचा कसोटी मालिकेत फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले, लीड्स

दूसरा सामना, 2-6 जुलै, बर्मिंगघम,

तिसरा सामना, 10-14 जुलै, लॉर्ड्स.

चौथा सामना: 23-27 जुलै, मँचेस्टर.

पाचवा सामना: 31 जुलै ते 4 ऑगस्ट, केनिंग्टन ओव्हल.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन), शोएब बशीर, जॅकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम ​​कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओवरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग आणि क्रिस वोक्स.