
वनडे ट्राय सीरिजमधील अंतिम सामन्यात रविवारी 11 मे रोजी वूमन्स टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने या सीरिजमधील साखळी फेरीत अप्रतिम कामगिरी केली. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारताने 4 पैकी 3 सामने जिंकले. तर श्रीलंकेने साखळी फेरीतील 4 पैकी 2 सामने जिंकले. तर यजमानांना 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. तसेच दोन्ही संघांची या मालिकेत फायनलनिमित्ताने एकमेकांसमोर येण्याची तिसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध 2 वेळा भिडलेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात उभयसंघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
टीम इंडियाकडे या सामन्यानिमित्ताने श्रीलंकेचा पराभव करुन टी 20 आशिया कप 2024 फायनलमधील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 28 जुलै रोजी अंतिम सामना झाला होता. तेव्हा श्रीलंकेने भारतावर मात करत आशिया कप उंचावला होता. त्यामुळे आता भारताकडे जवळपास 10 महिन्यांनी विजय मिळवून श्रीलंकेचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे. यात भारत किती यशस्वी ठरतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील अंतिम सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतात सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.
टीम इंडियाचा श्रीलंकेवर दबदबा
𝐅𝐢𝐧𝐚𝐥 𝐁𝐚𝐭𝐭𝐥𝐞 💪
India boasts a historical edge, yet Sri Lanka stunned with a rare victory in this Tri-Series! 👀#CricketTwitter pic.twitter.com/yZsz9XCxbM
— Female Cricket (@imfemalecricket) May 10, 2025
दरम्यान टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये दबदबा राहिला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकूण 34 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने यापैकी तब्बल 30 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेला केवळ 3 वेळाच यश मिळवता आलं आहे. त्यामुळे भारताने 31 वा विजय मिळवत श्रीलंकेचा घरच्या मैदानात धुव्वा उडवत आशिया कपचा हिशोब चुकता करावा, अशी प्रत्येक भारतीय चाहत्याची इच्छा आहे.
इंडिया वूमन्स टीम: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्री चरणी, स्नेह राणा, शुची उपाध्याय, काशवी गौतम, यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस आणि अरुंधती रेड्डी.