
आयपीएल 2024 स्पर्धेत मोठी उलटफेर पाहायला मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्सला 211 धावा वाचवता आल्या नाही. लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात निराशाजनक झाली होती. क्विंटन डी कॉकला आपलं खातंही खोलता आलं नाही. कर्णधार केएल राहुलही स्वस्तात बाद झाला होता. असं असूनही मार्कस स्टोयनिसने एकट्याने किल्ला लढवला. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 4 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं. मार्कस स्टोयनिसने 63 चेंडूत 13 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 124 धाावंची खेळी केली. तर निकोलस पूरनने 15 चेंडूत 34 आणि दीपक हूडाने 6 चेंडूत नाबाद 17 धावा ठोकल्या. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड निराश दिसला. त्याने सामन्यानंतर पराभवाचं खापर मैदानात पडलेल्या दवबिंदूवर फोडलं.
“हा पराभव पचवणं खरंच खूप कठीण आहे. पण एक चांगला खेळ झाला. लखनौने खरंच चांगली कामगिरी केली. 14 व्या षटकापर्यंत गेम आमच्या हातात होता. पण स्टोयनिस खरंच खूप चांगला खेळला. मैदानात पडलेल्या दवबिंदूंचा आम्हाला सर्वात जास्त फटका बसला. फिरकीपटूंना आम्हाला व्यवस्थित वापरता आलं नाही. तसं नसतं तर आम्ही सामन्यावर पकड मिळवली असती. पण शेवटी हा खेळ आहे आपल्या हातात काहीच नसतं.”, असं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला.
“रवींद्र जडेजा चौथ्या क्रमांकावर आला होता. आमचं ठरलं होतं की पॉवर प्लेनंतर विकेट पडली तर शिवम फलंदाजीला येईल. कारण फलंदाजांना आम्ही नंतर बाहेर पाडण्यास भाग पाडू शकत नाही. खरं सांगायचं तर आम्ही दिलेलं टार्गेट पुरेसं नव्हतं. आम्ही सराव करताना दव अनुभवलं आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता. या विजयाचं श्रेय पूर्णपणे त्यांच्या फलंदाजीला जातं.”, असं कर्णधार ऋतुराज गायकवाड पुढे म्हणाला.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.