U19 IND vs PAK : आयुष-वैभव सूर्यवंशीसह सर्वच फ्लॉप, टीम इंडियाचा फायनलमध्ये लाजिरवाणा पराभव, पाकिस्तान आशिया चॅम्पियन
U19 Asia Cup Final India vs Pakistan Final Match Result : पाकिस्तानने टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभूत करुन लीग स्टेजमधील पराभवाची परतफेड केली. पाकिस्तान यासह आशिया चॅम्पियन ठरली आहे.

अंडर 19 टीम इंडिया आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवत आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियासमोर 348 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे या स्टार जोडीकडून धावांचा पाठलाग करताना मोठ्या खेळीची आशा होती. मात्र आयुष आणि वैभवने घोर निराशा केली. तर इतर फलंदाजांनाही काही करता आलं नाही. पाकिस्तानने टीम इंडियाला 26.2 ओव्हरमध्ये 156 रन्सवर गुंडाळलं. पाकिस्तानने अशाप्रकारे 191 धावांनी अंतिम सामन्यात विजय मिळवत आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.
पाकिस्तानसाठी समीर मिन्हास आणि अहमद हुसैन या जोडीने सर्वाधिक धावा केल्या. अहमदने 56 धावांची खेळी केली. तर समीरने 172 धावा केल्या. तसेच इतरांनाही योगदान दिलं. पाकिस्तानने अशाप्रकारे 8 विकेट्स गमावून 347 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे 348 धावांचा पाठलाग करताना भारताला चांगल्या आणि स्फोटक सुरुवातीची गरज होती.
कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या जोडीवर भारताला शानदार सुरुवात करुन देण्याची जबाबदारी होती. जोडीने समाधानकारक सुरुवात केली. मात्र या दोघांना विजयी आव्हान पाहता काही खास करता आलं नाही. भारताने 32 धावांवर पहिली विकेट गमावली. आयुष म्हात्रे तिसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर 2 धावा करुन आऊट झाला. आयुष आऊट झाल्याने भारताला वैभवकडून आशा वाढल्या. मात्र पाकिस्तानचे गोलंदाज भारतावर वरचढ ठरले. पाकिस्तानने टीम इंडियाला 10 ओव्हरमध्ये 5 झटके दिले आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली.
टॉप आणि मिडल ऑर्डर ढेर
आयुषनंतर एरॉन जॉर्ज 16 धावा करुन आऊट झाला. वैभव सूर्यवंशी याने वादळी सुरुवात केली. मात्र वैभव फटकेबाजीच्या प्रयत्नात आऊट झाला. वैभवने 10 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह 26 रन्स केल्या. विहान मल्होत्रा याने 7 तर वेदांत त्रिवेदी याने 9 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची 9.4 ओव्हरमध्ये 5 आऊट 68 अशी वाईट स्थिती झाली.
भारताचा अंतिम सामन्यात पराभव
A defeat for India U19 in the #Final by 191 runs.
Scorecard ▶️ https://t.co/ht0DLU8XQ3#MensU19AsiaCup2025 pic.twitter.com/FTmHWPbkVD
— BCCI (@BCCI) December 21, 2025
पाकिस्तानने टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके देणं सुरुच ठेवलं. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र अभिग्यान कुंदु, खिलान पटेल आणि दीपेश देवेंद्रन या तिघांनी छोटेखानी खेळी केली. अभिग्यान 13, खिलान 19 आणि दीपेशने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानने भारताचं अशाप्रकारे 26.2 ओव्हरमध्ये 156 रन्सवर पॅकअप केलं आणि विजय मिळवला. पाकिस्तानसाठी अली रझा याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद सय्याम, अब्दुल सुभान आणि हुझेफा अहसान या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
