IPL 2024 : महेंद्र सिंग धोनीच्या या व्हिडिओमुळे चाहत्यांच्या वाढल्या चिंता

महेंद्र सिंग धोनी हा जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधार मानला जातो. आयपीएलमध्ये देखील तो तितकाच लोकप्रिय आहे. त्याला खेळताना पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सूक असतात. धोनी मैदानावर आला की त्याचे शॉट्स पाहण्यासारखे असतात. ज्यामुळे चाहते आनंदीत होतात.

IPL 2024 : महेंद्र सिंग धोनीच्या या व्हिडिओमुळे चाहत्यांच्या वाढल्या चिंता
| Updated on: Apr 01, 2024 | 7:28 PM

MS Dhoni : रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. असं असलं तरी चेन्नई चाहत्यांनी ही मॅच खुप एन्जॉय केली. कारण महेंद्रसिंग धोनी या सामन्यात बॅटिंगसाठी मैदानात आला होता. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पहिला पराभव झाला असला तरी या सामन्यात धोनी हिरो ठरला आहे. विशाखापट्टणममध्ये एमएस धोनीचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले आणि ते कोणत्याही शाही आदरातिथ्यापेक्षा कमी नव्हते. मात्र, रात्री उशिरापर्यंत एमएस धोनी लंगडत असतानाचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. CSK ने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

31 मार्च रोजी झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा पराभव केला होता. धोनीने चांगली खेळी केली. पण तो विजय खेचून आणू शकला नाही. 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने त्याने धावा केल्या. धोनी मैदानात आला तेव्हा सगळ्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. यावेळी त्याने चाहत्यांचे आभार मानले कारण तो या मोसमात प्रथमच फलंदाजीसाठी आला होता.


एमएस धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो चालताना लंगडत असल्याचे दिसत आहे. एक फोटो देखील समोर आला होता, ज्यामध्ये एमएस धोनीच्या डाव्या पायाला सपोर्ट बँड बांधला होता, ज्यामध्ये सक्शन कप जोडलेला होता. मागच्या सीजनमध्ये धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता, पण तरी तो संपूर्ण हंगाम खेळला. मात्र, यावेळी तो लंगडत असल्याचे दिसल्याने चाहत्यांना काळजी वाटू लागली आहे.

आयपीएल 2024 सीझनचा अजून सुरुवातीचा टप्पा सुरु आहे. परंतु धोनीला असं लंगडत असताना पाहणं चेन्नईच्या चाहत्यांची चिंता वाढवणारे आहे. सीएसके संघाची देखील चिंता यामुळे वाढली आहे. तो कर्णधार नसला तरी संघात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. धोनीकडे अजून चार दिवस आहेत. तोपर्यंत तो चांगला झाला तर तो पुढच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो. सीएसकेचा पुढचा सामना 5 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.