DC vs RR : सुपर ओव्हरही टाय झाल्यास विजयी संघ असा ठरतो, जाणून घ्या नियम

Ipl Super Over Rule : दिल्ली कॅपिट्ल्सने राजस्थान रॉयल्सला 188 धावांवरच रोखल्याने सामना बरोबरीत राहिला. त्यानंतर दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर विजय मिळवला. समजा सुपर ओव्हरही टाय झाली असती तर विजेता कोणता संघ ठरला असता? जाणून घ्या नियम.

DC vs RR : सुपर ओव्हरही टाय झाल्यास विजयी संघ असा ठरतो, जाणून घ्या नियम
Super Over Ipl Rules
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 17, 2025 | 4:14 PM

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 32 वा सामना हा 16 एप्रिलला खेळवण्यात आला. सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरद्वारे विजेता निश्चित केला देला. दोन्ही संघांनी 20 ओव्हरमध्ये प्रत्येकी 188-188 धावा केल्या. त्यामुळे सामना बरोबरी सुटला. त्यानंतर मिचेल स्टार्क याने सुपर ओव्हरमध्ये चिवट बॉलिंग करत दिल्लीच्या विजयात योगदान दिलं. ट्रिस्टन स्टब्स आणि केएल राहुल या जोडीने 12 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं आणि दिल्लीने पाचवा विजय साकारला. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील ही पहिलीवहिली सुपर ओव्हर ठरली.

क्रिकेट चाहत्यांकडून या सुपर ओव्हरनिमित्ताने काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे सुपर ओव्हर टाय झाल्यास काय? सुपर ओव्हर टाय झाल्यास विजेता संघ कोण ठरणार? याबाबत नियम काय आहे? हे जाणून घेऊयात.

सुपर ओव्हर टाय झाल्यास निकाल कसा लावला जातो?

आयपीएल नियमांनुसार, सामना टाय झाल्यानंतर 10 मिनिटांमध्ये सुपर ओव्हरला सुरुवात व्हायला हवी. त्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाल्यास दुसऱ्या सुपर ओव्हरला 5 मिनिटांच्या आत सुरुवात होणं बंधनकारक आहे. तसेच दुसरी सुपर ओव्हरही टाय झाल्यास पुढील 1 तासात शक्य तितके सुपर ओव्हर खेळवण्यात येतील. मात्र शेवटची सुपर ओव्हर कोणती असेल? हे ठरवण्याचा अधिकार पंचांना असेल. तसेच 1 तासाच्या कालावधीदरम्यान सुपर ओव्हर होणं शक्य नसेल तर मॅच टाय झाल्याच जाहीर केलं जाऊ शकतं.

असा रंगला सुपर ओव्हरचा थरार

सामना बरोबरीत सुटल्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करणारी टीम सुपर ओव्हरमध्ये पहिले बॅटिंग करते. त्यामुळे राजस्थानला पहिले बॅटिंग करावी लागली. मात्र राजस्थानचे दोन्ही फलंदाज रन आऊट झाल्याने त्यांना पूर्ण 6 चेंडूही खेळता आले नाहीत. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी 12 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान ट्रिस्टन स्टब्स आणि केएल राहुल या जोडीने 2 चेंडूंआधी पूर्ण केलं.

दिल्लीचा पाचवा विजय

दरम्यान दिल्लीने यासह 18 व्या मोसमात पाचवा विजय साकारला. दिल्लीने आतापर्यंत या हंगामात अक्षर पटेल याच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी केली आहे. दिल्लीने 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीने पहिले सलग 4 सामने जिंकले. त्यानंतर मुंबईने दिल्लीचा विजय रथ रोखला. त्यानंतर आता दिल्लीने सुपर ओव्हरमध्येही कमाल केली आणि विजयी ‘पंच’ लगावला.