
गुणतालिकेत टॉपला असलेल्या गुजरात टायटन्सने साखळी फेरीतील शेवटचे दोन सामने गमावल्याने प्लेऑफचं चित्र अजूनही अस्पष्ट आहे. त्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यानंतर टॉप 2 मधील एका संघाचं गणित ठरणार आहे. पण दुसऱ्या संघासाठी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस आहे. साखळी फेरीतील 70 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. या सामन्यातील लढतीनंतर प्लेऑफचं चित्र स्पष्ट होणार आहे. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात कोणीही जिंकू अथवा हरू देत, 70 व्या सामन्यानंतरच दुसरा संघाचं टॉप 2 मधील गणित स्पष्ट होणार आहे. कसं काय ते समजून घेऊयात.
पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने विजय मिळवला तर 19 गुणांसह टॉप 2 मध्ये जाईल. पण हा सामना पंजाबने गमावला तर मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये जाईल. कारण मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट हा गुजरात टायटन्सपेक्षा चांगला आहे. या दोन्ही पैकी एका संघाचं विजयानंतर टॉपमधील स्थान पक्कं होईल. पण दुसरा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यात स्पष्ट होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं तर 19 गुणांसह गुणतालिकेत टॉप 2 मधील जागा पक्की करेल. पण पराभव झाला तर गुजरात टायटन्सला संधी मिळेल. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्सचा पराभव झाला तर गुजरात टायटन्सच्या पथ्यावर पडेल. त्यामुळे आरसीबीचा पराभव झाला तर गुजरात टायटन्सला टॉप 2 मध्ये संधी मिळू शकते. अन्यथा एलिमिनेटर फेरीत लढावं लागेल.
जर मुंबई आणि आरसीबीने शेवटचा सामना जिंकला तर..
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला आणि आरसीबीने लखनौ पराभूत केलं. तर हे दोन्ही संघ टॉप 2 मध्ये असतील. क्वॉलिफायर 1 मध्ये मुंबई विरुद्ध आरसीबी लढत होईल. तर एलिमिनेटरमध्ये गुजरात विरुद्ध पंजाब सामना होईल.
जर मुंबईने सामना जिंकला आणि आरसीबी हरली तर…
मुंबईने पंजाब किंग्सला हरवलं आणि आरसीबीला शेवटच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर गणित कसं असेल ते समजून घ्या. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स अशी प्लेऑफमधील क्वॉलिफाय 1 मध्ये लढत होईल. तर एलिमिनेटर फेरीत आरसीबी विरुद्ध पंजाब अशी लढत असेल.
जर मुंबईने सामना गमावला आणि आरसीबीही हरली तर…
मुंबई इंडियन्स आणि आरसीबीने शेवटचे सामने गमावले तर गुजरात आणि पंजाबला टॉप 2 मध्ये संधी मिळेल. पंजाब किंग्स 19, तर गुजरात 18 गुणांसह टॉप 2 मध्ये असेल. क्वॉलिफायर 1 मध्ये गुजरात विरुद्ध पंजाब, तर एलिमिनेटर फेरीत मुंबई विरुद्ध आरसीबी लढत पाहायला मिळेल.
जर मुंबईने सामना गमावला आणि आरसीबी जिंकली तर…
मुंबईने पंजाब किंग्सविरुद्धचा सामना गमावला आणि आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं तर क्वॉलिफाय 1 गणित वेगळं असेल. पंजाब किंग्स आणि आरसीबी क्वॉलिफाय 1 मध्ये भिडतील. तर एलिमिनेटर फेरीत मुंबई विरुद्ध गुजरात सामना पाहायला मिळेल.