
मुंबई इंडियन्सने 30 मे रोजी मुल्लानपूरमधील स्टेडियममध्ये झालेल्या आयपीएल 2025 एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सवर 20 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने गुजरातसमोर 229 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र गुजरातला 208 रन्सच करता आल्या. मुंबईने यासह क्वालिफायर-2 मध्ये धडक दिली. त्यामुळे आता अंतिम फेरीसाठी क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना 1 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 2 हात करेल.
आयपीएलच्या 18 व्या मोसमात गुरुवारी 29 मे रोजी क्वालिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरुने पंजाब किंग्सवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली. आरसीबीची फायनलमध्ये पोहचण्याची 2016 नंतरची पहिलीच वेळ ठरली. तर पंजाब पहिल्या फेरीत फायनलमध्ये पोहचण्यात अपयशी ठरली. मात्र पंजाब साखळी फेरीत पहिल्या स्थानी राहिली. त्यामुळे पंजाबला फायनलमध्ये पोहचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. त्यानुसार एलिमिनिटेर जिंकणाऱ्या संघाविरुद्ध पंजाबचा सामना होणार आहे. एलिमिनेटरचा निकाल लागल्याने पंजाबसमोर मुंबईचं आव्हान असणार आहे, हे स्पष्ट झालं आहे.
क्वालिफायर 2 निमित्ताने पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांची या 18 व्या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ 26 मे रोजी आमनेसामने आले होते. तो दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. पंजाबने त्या सामन्यात मुंबईवर मात करत टॉप 2 मध्ये प्रवेश मिळवला होता. पंजाबला त्या विजयामुळेच अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळाली. मात्र आता त्याच मुंबई विरुद्ध पंजाबची गाठ असणार आहे.
दरम्यान मुंबईपेक्षा पंजाब किंग्सने 18 व्या मोसमात साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. पंजाबने 14 पैकी 9 सामने जिंकले. तर पंजाबला 4 वेळा पराभूत व्हावं लागलं. तसेच पंजाबचा 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 19 पॉइंट्स होते. तर पंजाबचा नेट रनरेट हा साखळी फेरीनंतर +0.372 असा होता.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईने पंजाबच्या तुलनेत 1 सामना कमी जिंकलाय. मात्र मुंबईचा नेट रनरेट इतर सर्व संघाच्या तुलनेत चांगला आहे. मुंबईने साखळी फेरीतील 14 पैकी 8 सामने जिंकले. तर पलटणला 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा 16 गुणांसह नेट रनरेट हा +1.142 असा होता.