RCB vs KKR सामना पावसामुळे रद्द, केकेआरचा पत्ता कट, बंगळुरुची प्लेऑफची प्रतिक्षा अजूनही कायम

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders Ipl 2025 : आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. या मोसमातील सामना पावसामुळे रद्द होण्याची ही तिसरी वेळ ठरली. सामना रद्द होताच केकेआरचं आव्हान संपुष्ठात आलं आहे.

RCB vs KKR सामना पावसामुळे रद्द, केकेआरचा पत्ता कट, बंगळुरुची प्लेऑफची प्रतिक्षा अजूनही कायम
RCB vs KKR Match abandoned due to rain
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 17, 2025 | 10:57 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु होती. त्यामुळे बराच वेळ पाऊस थांबण्याची आणि खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र खेळ होऊ शकणार नसल्याचं स्पष्ट होताच सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. आयपीएलकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सामना पावसामुळे रद्द होण्याची ही तिसरी वेळ ठरली.

पावसामुळे चाहत्यांची निराशा

आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार होता. मात्र चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडे पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तर दुसऱ्या बाजूला पावसाची बॅटिंग सुरु होती. काही वेळ पाऊस थांबल्याने ग्राउंड स्टाफने खेळपट्टी कोरडी करण्यासाठी फार मेहनत घेतली. मात्र पावसाने पुन्हा सुरुवात केली. मात्र चाहत्यांना सामना सुरु होणार, अशी आशा होती.

पंचांनी पाऊस थांबल्यानंतर मैदानाची पाहणी केली. मात्र काही वेळानंतर सामना होणार नसल्याचं स्पष्ट झालं. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं आणि यासह सामना टॉसशिवाय रद्द झाल्याचं स्पष्ट झालं. अशाप्रकारे रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सामना रद्द करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

आरसीबी विरुद्ध केकेआर सामना पावसामुळे रद्द

केकेआरचा पत्ता कट

सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. केकेआरचं यासह 13 सामन्यांनंतर 12 गुण झआले. तर यासह गतविजेत्या कोलकाताचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्ठात आलं आहे. केकेआर या 18 व्या मोसमातून बाहेर पडणारी चौथी टीम ठरली आहे. तर आरसीबीच्या खात्यात 1 गुण जोडला गेला. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात 12 सामन्यानंतर 17 गुण झाले आहेत. मात्र त्यानंतरही आरसीबी प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकलेली नाही.