श्रेयस अय्यरवर BCCI ची कारवाई, मुंबईविरोधात विजय मिळवताना पंजाबकडून झाली ही चूक

PBKS vs MI Qualifier 2: श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाच्या खेळीमुळे पंजाब किंग्जने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ५ गडी राखून विजय मिळवला. आता ३ जून रोजी पंजाब आणि आरसीबी यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

श्रेयस अय्यरवर BCCI ची कारवाई, मुंबईविरोधात विजय मिळवताना पंजाबकडून झाली ही चूक
श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या
| Updated on: Jun 02, 2025 | 10:09 AM

IPL 2025: पंजाब किंग्सच्या संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा 5 गडी राखत पराभव केला. प्रथम फलंदाजी करत हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने 203 धावा केल्या होत्या. अय्यर याच्या पंजाब संघाला हे आव्हान अवघड गेले नाही. त्याच्या संघाने 19 षटकांत हे लक्ष्य पूर्ण केले. 2014 नंतर प्रथमच पंजाबचा संघ अंतिम सामन्यात पोहचला आहे.

श्रेयस अय्यर याने कर्णधार म्हणून इतिहास रचला. श्रेयस याने मुंबई विरोधात ८७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. ४१ चेंडूंच्या त्याच्या दमदार खेळीत ८ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश आहे. या खेळीमुळे त्याची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली. तीन संघाना आपल्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहचवणारा तो आयपीएलच्या इतिहासात पहिला कर्णधार बनला आहे.

श्रेयस अय्यरला का झाला दंड?

पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याला स्लो ओव्हर रेटमुळे २४ लाखांचा दंड करण्यात आला. त्याच्या संघाकडून दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयने म्हटले की, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याला दंड करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स विरोधात दुसऱ्या क्वालीफायर सामन्यात पंजाबकडून स्लो ओव्हर रेट ठेवला गेला. यामुळे अय्यर याला २४ लाखांचा दंड करण्यात आला आहे. तसेच इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनचा इतर खेळाडूंना सहा लाख रुपये किंवा त्यांच्या सामन्याच्या शुल्कातून २५ टक्के जी रक्कम कमी असेल ती कपात करण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यालाही दंड लावण्यात आला आहे. षटकाचा वेग कमी ठेवल्याबद्दल त्यालाही दंड केला आहे. मुंबई आणि पंजाबचा सामना पावसामुळे दोन तास उशिराने सुरु झाला होता. परंतु षटके कमी करण्यात आली नव्हती. आता अंतिम सामना पंजाब आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. ३ जून रोजी हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.