
सनरायजर्स हैदराबादने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सवर मोठ्या फरकाने मात करत आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवट विजयाने केला आहे. हैदराबादने केकेआरचा 110 धावांनी धुव्वा उडवला. हैदराबादने केकेआरसमोर विजयासाठी 279 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांना 18.4 ओव्हरमध्ये 168 रन्सवर गुंडाळलं. हैदराबादने यासह आयपीएलच्या इतिहासातील त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय साकारला. तसेच हैदराबादने या विजयासह या हंगामात विजयी हॅटट्रिकही पूर्ण केली. हैदराबादने त्यांच्या साखळी फेरीतील शेवटचे 3 सामने जिंकले.
कोलकाताचे फलंदाज डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना फ्लॉप ठरले. सुनील नारायण, मनीष पांडे आणि हर्षित राणा या तिघांचा अपवाद वगळता इतर कुणालाही 30 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. सुनील नारायण याने 31, हर्षित राणा याने 34 तर मनीष पांडे याने सर्वाधिक आणि 37 धावा केल्या. दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर दोघे आले तसेच परत गेले अर्थात भोपळाही फोडू शकले नाहीत. सनरायजर्स हैदराबादच्या जयदेव उनाडकट, एशान मलिंगा आणि हर्ष दुबे या त्रिकुटाने केकेआरचं पॅकअप केलं. या तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
त्याआधी हैदारबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला आणि आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 278 रन्स केल्या. हैदराबादसाठी हेनरिक क्लासेन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. क्लासेन याने आयपीएल इतिहासातील संयुक्तरित्या तिसरं सर्वात वेगवान शतक झळकावलं. क्लासेनने 37 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. तर 39 बॉलमध्ये 9 सिक्स आणि 7 फोरसह नॉट आऊट 105 रन्स केल्या. ट्रेव्हिस हेड याने 40 चेंडूत 76 रन्स केल्या. तर अभिषेक शर्मा याने 32 आणि इशान किशन 29 रन्स केल्य. तर अनिकेत वर्मा याने नाबाद 12 धावा केल्या. केकेआरसाठी सुनील नारायण याने 2 विकेट्स मिळवल्या. तर वैभव अरोरा याने एक विकेट घेतली.
ऑरेंज आर्मीचा धमाकेदार विजय
Ice in his veins, fire in his bat 🔥
Heinrich Klaasen ends the #TATAIPL 2025 season with a record hundred & a Player of the Match award 🧡
Relive his knock ▶ https://t.co/DEIREvm1tl #TATAIPL | #SRHvKKR pic.twitter.com/vvvzPOIhyw
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
दरम्यान हैदराबादने या विजयासह केकेआरचा आणखी एक हिशोब क्लिअर केला. केकेआरने केलेल्या पराभवाची हैदराबादने परतफेड केली. हैदराबाद विरुद्ध केकेआर या दोन्ही संघांची 18 व्या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ होती. याआधी दोन्ही संघ 3 एप्रिल रोजी आमनेसामने आले होते. तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर 80 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. हैदराबादने जाता जाता केकेआरचा हिशोब बरोबरक केला.