
आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या सुपर ओव्हरची अनुभूती क्रीडाप्रेमींना मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 188 धावा केल्या आणि विजयासाठी 189 धावा दिल्या. पण राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 188 धावाच केल्या. त्यामुळे सामना ड्रॉ झाला आणि सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 2 विकेट राखून पराभव केला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचे 10 गुण झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सने एक पाऊल प्लेऑफच्या दिशेने टाकलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह 10 गुण मिळवले आहेत. सुपर ओव्हरमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. पण दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सवर भारी पडली. या विजयाचं खरं श्रेय मिचेल स्टार्ककडे जातं. कारण त्याच्यामुळेच सुपर ओव्हरमध्ये सामना गेला.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम सुपर ओव्हर टाकली आणि राजस्थान रॉयल्सकडून फलंदाजीसाठी करण्यासाठी शिरोमन हेटमायर आणि रियान पराग उतरले होते. सुपर ओव्हरसाठी दिल्लीने मिचेल स्टार्कच्या हाती चेंडू सोपवला.मिचेल स्टार्कच्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी शिरोमन हेटमायर होता. पहिलाच चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर हेटमायरने काही चूक केली नाही आणि चौकार मारला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फसला आणि चौकार पडला. तिसऱ्या चेंडूवर हेटमायरने एक धाव घेतली आणि रियान परागला स्ट्राईक मिळाली. रियान परागने चौथ्या चेंडूवर चौकार मारला. पण हा चेंडू नो असल्याचं घोषित झाला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण मिचेल स्टार्कने साईड लाईन टच केल्याने नो बॉल दिला. त्यानंतरच्या चेंडूवर रियान पराग रनआऊट झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल आला. पण स्ट्राईकला हेटमायर होता. त्यानंतर जोरदार फटका मारला मात्र दोन धाव घेताना यशस्वी जयस्वाल रनआऊट झाला. त्यामुळे 11 धावा झाल्या आणि 12 धावांचं आव्हान दिलं गेलं.
विजयासाठी दिलेल्या 12 धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स ही जोडी मैदानात आली. राजस्थानकडून संदीप शर्मा गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर स्ट्राईकला असलेल्या केएल राहुलने दोन धावा घेतल्या. या चेंडूवर रनआऊटची संधी हुकली. दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलने चौकार मारला. त्यामुळे 4 चेंडूत सहा धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि ट्रिस्टन स्टब्स स्ट्राईकला आला. तीन चेंडूत पाच धावांची गरज होती. स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार मारला आणि दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला.