क्रिकेटच्या पलीकडील आयपीएलचा धंदा, टीमचे मालक असे कमावतात करोडोंमध्ये पैसा, जाणून घ्या अर्थकारण
IPL Business Model in Marathi : आयपीएल स्पर्धेचं अर्थकारण थोडक्या शब्दात सांगणं म्हणजे एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्यासारखं आहे. त्यामुळे आयपीएलमधील ही सर्व आकड्याची आणि पैशांची गणितं कशी ठरतात? सामन्यात जसा रनरेट महत्त्वाचा तसाच आयपीएलमध्ये पैसा महत्त्वाचा. पण या सर्वात श्रीमंत लीगमधील संघांची कमाई कशी होते? पराभवानंतर पण मालकांना फायदा होतो? सर्वसामान्य वाचकांच्या मनातील प्रश्नांचा अभ्यास करुन आम्ही निरसण करण्याचा प्रयत्न केलाय. जाणून घ्या.

आयपीएल म्हणजे भारतात एक उत्सवच झाला आहे. प्रसिद्ध क्रिकेट लीगमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा समावेश होतो. पाण्यासारखा पैसा म्हणजे करोडो रूपयांची उलाढाल या लीगदरम्यान होते. क्रिकेट वर्ल्ड कप पेक्षाही भारतातील क्रिकेट चाहते आयपीएलची उत्सुकतेने वाट पाहतात. भारतामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि रात्री टीव्हीवर आयपीएलचे सामने हे एक समीकरणच झालं आहे. या प्रसिद्ध लीगमध्ये आयपीएल विजेत्या संघाला 20 कोटी रूपये मिळतात. पण प्रत्येक संघासाठी ही रक्कम शुल्लक आहे. कारण संघातील खेळाडूंना लिलावातच करोडो रूपयांमध्ये विकत घेतलं जातं. मग आयपीएल टीम मालकांना करोडो रूपये खर्च करून काय फायदा? तुम्ही फक्त आयपीएल पाहिलीत मात्र त्यामागचं अर्थकारणही समजून घ्या. ...
