
सनरायजर्स हैदराबादने शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या थरारक आणि रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सवर सनसनाटी विजय मिळवला. हैदराबादने पंजाबवर 2 धावांनी मात केली. हैदराबादकडून पंजाबला विजयासाठी 183 धावांचं आव्हान मिळालं होतं. पंजाबने या धावांचा पाठलाग करताना जोरदार लढत दिली. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा या जोडीने पंजाबच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांना पंजाबला विजय मिळवून देण्यात यश आलं नाही. हैदराबादचा हा या हंगामातील तिसरा विजय ठरला. या विजयानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये कोणते गोलंदाज आहेत? हे जाणून घेऊयात.
पर्पल कॅपच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान अव्वल स्थानी कायम आहे. मुस्तफिजूर याने 4 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे. चहलने 4 सामन्यात 8 विकेट्स घेतल्यात. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी अदलाबदल झाला आहे. नक्की काय बदल झालाय? कुणाची एन्ट्री झालीय? जाणून घेऊयात. पंजाब किंग्सच्या अर्शदीप सिंह याने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. अर्शदीपने यासह पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय. अर्शदीप तिसऱ्या क्रमांकावर आल्याने दिल्ली कॅपिट्ल्सचा खलील अहमद चौथ्या क्रमांकावर आला आहे. खलील अहमद पंजाब विरुद्ध हैदराबाद सामन्याआधी तिसऱ्या स्थानी होता.
अर्शदीप आणि खलील या दोघांच्या नावावर 5 सामन्यात अनुक्रमे 8 आणि 7 विकेट्स आहेत. खलील अहमद चौथ्या स्थानी आल्याने गुजरातचा मोहित शर्मा सहाव्या स्थानी गेला आहे. मोहित या सामन्याआधी चौथ्या क्रमांकावर होता. तर पंजाबच्या कगिसो रबाडा याने 1 विकेट घेतल्याने तो पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. कगिसोमुळे मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोएत्झी सातव्या स्थानी गेला आहे.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.