
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताची धावसंख्या 300 पर्यंत जाणार अशी स्थिती होती. पण जेम्स नीशमच्या एका षटकाने सर्व चित्र बदललं. त्याने एका षटकात तीन विकेट घेतल्या आणि टीम इंडियाच्या धावगतीला ब्रेक लावला. त्याने 4 षटकात 46 धावा देत 3 गडी बाद केले. पण असं असलं तरी टीम इंडियाने 255 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना न्यूझीलंडने 96 धावांनी गमावला आणि पहिल्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. असं असताना जेम्स नीशमने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका फ्रेंचायझीकडून नीशमचे पैसे येणं बाकी आहे. नीशमने सोशल मीडियावर फ्रेंचायझीकडून थेट पैशांची मागणी केली. चला जाणून घेऊयात हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जेम्स नीशमची कामगिरी पाहून पोखरा एवेंजर्सने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं की, ‘नीशमचे अभिनंदन. टी-२० विश्वचषक फायनलच्या १६ व्या षटकात जिमी नीशमचा उत्कृष्ट षटक. W 0 0 1 W W. भारताविरुद्ध तीन विकेट्स, एक धाव आणि दोन डॉट्स टाकले. मोठ्या मंचावर एक शानदार स्पेल. न्यूझीलंड अंतिम फेरीत उपविजेतेपदावर राहिला हे दुर्दैवी आहे. एनपीएल सीझन २ मध्ये त्याला पोखरा एव्हेंजर्सचे प्रतिनिधित्व करताना पाहून अभिमान वाटला.” या पोस्टवर नीशमने अनपेक्षित उत्तर दिले. नीशमने लिहिलं की, “छान, तुमच्या खेळाडूंना पैसे द्या.” नीशमच्या व्हेरिफायड प्रोफाइलवरून पोस्ट केलेली ती कमेंट नंतर दिसत नव्हती. कदाचित वाद वाढल्याचं पाहून ती डिलीट केली असावी.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) March 10, 2026
जेम्स नीशम नेपाळ प्रीमियर लीग स्पर्धेत पोखरा एवेंजर्सकडून खेळला. या स्पर्धेत एकूण 4 सामने खेळला आणि 33 च्या सरासरीने 99 धावा केल्या. यासह पाच विकेटही घेतल्या. पण पोखरा एवेंजर्स हा संघ 7 पैकी 3 सामन्यात विजयी ठरला आणि प्लेऑफमध्ये जागा बनवू शकला नाही. पण असं असताना लीग स्पर्धेत खेळवून खेळाडूंना पैसे न देणं ही चुकीची बाब आहे. त्यामुळे पोखराची संघ व्यवस्थापन सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.