
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघात विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याची निवड करण्यात आली आहे. संजूने आशिया कपआधी केरळ क्रिकेट लीग 2025 स्पर्धेत स्फोटक फलंदाजी करत साऱ्या क्रिकेट वर्तुळातचं लक्ष वेधून घेतलं आहे. संजू या स्पर्धेत कोची ब्लू टायगर्स टीमकडून खेळत आहे. संजूने या स्पर्धेत कोची ब्लू टायगर्सच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सामन्यात सलग तिसऱ्यांदा 50 पेक्षा अधिक धावा केल्या. तसेच संजूने या 3 डावांत एकूण 21 षटकार लगावले. मात्र याच स्पर्धेत एका फलंदाजाने धमाका केलाय. या फलंदाजाने 12 चेंडूत 11 षटकार ठोकत गोलंदाजांची धुलाई केलीय.
केसीएल 2025 स्पर्धेतील 19 व्या सामन्यात कालिकत ग्लोबस्टार्सच्या सलमान निझार याने अदाणी त्रिवेंद्रम रॉयल्स विरुद्ध इतिहास घडवला. सलमानने पहिल्या डावात बॅटिंग करताना 12 बॉलमध्ये 11 सिक्स ठोकले. सलमानने अवघ्या 26 बॉलमध्ये 330.77 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 86 रन्स केल्या. सलमानने या दरम्यान डावातील शेवटच्या 2 षटकांमध्ये 11 षटकार लगावले. सलमानने केलेल्या नाबाद 86 धावांमुळे कालिकतला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 186 पर्यंत मजल मारली.
कालिकतने 18 ओव्हरपर्यंत 6 विकेट्स गमावून 115 धावा केल्या होत्या. मात्र सलमानने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चित्रच बदललं. सलमानने शेवटच्या 12 बॉलमध्ये 11 सिक्स ठोकले आणि 71 धावा जोडल्या.
सलमानने 18 व्या ओव्हरपर्यंत 13 बॉलमध्ये 17 धावा केल्या होत्या. सलमानने त्यानंतर 19 व्या ओव्हरची सुरुवात सिक्सने केली. सलमानने सलग 5 सिक्स ठोकले. मात्र सलमानला ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर सिक्स मारता आला नाही. सलमानला 1 धावाच घेता आली. सलमान अशाप्रकारे पुन्हा स्ट्राईकवर आला.
सलमानने शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिक्स ठोकला. सलमानने यासह अवघ्या 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाने वाईड आणि नो बॉल टाकला. सलमानने या दोन्ही चेंडूंवर 2 धावा केल्या.
प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज दबावात होता. सलमानने याचा फायदा घेतला. सलमानने त्यानंतर पुढील पाचही चेंडूत 5 षटकार लगावले. सलमानने अशाप्रकारे शेवटच्या 12 चेंडूत 11 षटकार लगावत धावांचा पाऊस पाडला.
सलमानचा शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धमाका
One man. One over. Five rockets launched into orbit. 🚀
Salman Nizar just turned the 19th into a massacre!#KCLSeason2 #KCL2025 pic.twitter.com/up2rGcTdqU— Kerala Cricket League (@KCL_t20) August 30, 2025
दरम्यान सलमानने अखेरच्या 2 ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे कालिकतचा विजयी झाली. कालिकतने अदाणी त्रिवेंद्रम रॉयल्ससमोर 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र अदाणी त्रिवेंद्रम रॉयल्स टीमला 19.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 173 धावांपर्यंतच पोहचता आलं. कालिकतने अशाप्रकारे हा सामना 13 धावांनी जिंकला.