
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. दुसऱ्या दिवशीच पहिल्या डावाचा खेळ संपला आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने सर्व विकेट गमवून 224 धावा केल्या. तर इंग्लंडचा संघ 247 धावांवर तंबूत परतला. इंग्लंडकडे पहिल्या डावात 23 धावांची आघाडी आहे. आता भारतीय संघ दुसऱ्या डावात किती धावा करतो याकडे लक्ष लागून आहे. असं असताना भारतीय संघ गोलंदाजी करत असताना भर मैदानात राडा झाला. लॉर्ड्स कसोटी सामन्यापासून प्रत्येक कसोटी सामन्यात काही ना काही घडत आहे. आता शेवटच्या कसोटी सामन्यातही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. पण यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू नाही तर पंचांशी वाद झाला. उपकर्णधार केएल राहुल आणि श्रीलंकन पंच कुमार धर्मसेना यांच्यात वादावादी झाली.
भारताने पहिल्या डावात केलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. विकेट पडल्यानंतर भारतीय संघावरील दबाव स्पष्ट दिसत होता. असं असताना इंग्लंड फलंदाजी करत असताना 22 व्या षटक प्रसिद्ध कृष्णा टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जो रूटला फसला. त्यानंतर प्रसिद्धने जो रूटला काही बोलला. त्यावर जो रूटने सौम्य प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जो रूटने चौकार मारल आणि प्रसिद्ध कृष्णा पुन्हा काही पुटपुटला. त्यामुळे रूट भडकला आणि त्याने प्रसिद्ध कृष्णाला रागाच्या भरात उत्तर दिलं.
हा प्रकार घडत असताना पंच धर्मसेना आणि केएल राहुल यांच्यात वादाची ठिणगी पडली. रुट-प्रसिद्ध यांच्यात वाद वाढत असताना पंच धर्मसेनाने थांबवलं. तसेच प्रसिद्ध असं करून नकोस अशी ताकीद दिली. केएल राहुलला ही बाब खटकली. त्याने पंच धर्मसेनावर प्रश्नांचा भडिमार केला. भारतीय संघ गप्प बसेल का?
पंच धर्मसेना आधीच एका कृत्यामुळे या सामन्यात क्रीडाप्रेमींच्या रडारवर आला आहे. आता या वादानंतर पंच धर्मसेना भारतीय ओपनर आणि गोलंदाजाविरुद्ध कारवाई करणार का? क्रिकेट नियमानुसार, कोणताही खेळाडू पंचांच्या निर्णयाविरुद्ध प्रश्न उपस्थित करू शकत नाही. पंचांशी वाद घालू शकत नाही. असं केल्यास खेळाडूला शिक्षा होऊ शकते. इतकंच काय डिमेरिट पॉइंटही जोडला जाऊ शकतो.