अवघ्या 6 धावांवर काम तमाम, 10 खेळाडू शून्यावर बाद, 4 चेंडूत निकाल

| Updated on: Jun 18, 2021 | 11:08 PM

अनेकदा आपण कल्पनाही करु शकत नाही, असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ऐतिहासिक टी-20 सामन्याबद्दल सांगणार आहोत.

अवघ्या 6 धावांवर काम तमाम, 10 खेळाडू शून्यावर बाद, 4 चेंडूत निकाल
cricket (प्रातिनिधिक फोटो)
Follow us on

मुंबई : बातमीचा मथळा (Headline) वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल ना? कसोटी, एकदिवसीय किंवा टी – 20 क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात एखाद्या संघाने अशी कामगिरी करणे अविश्वसनीय आणि अकल्पनीय आहे. विशेषत: टी-20 सारख्या खेळात तर असं होणं शक्यच नाही, असं अनेकांना वाटू शकतं, कारण या प्रकारत फलंदाजांचा जलवा पाहायला मिळतो. परंतु क्रिकेटला उगीचच अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जात नाही. अनेकदा आपण कल्पनाही करु शकत नाही, असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ऐतिहासिक टी-20 सामन्याबद्दल सांगणार आहोत, ज्या सामन्यामध्ये संपूर्ण संघ अवघ्या 6 धावांमध्ये बाद झाला होता. इतकंच नव्हे तर या सामन्यात अशा आही अविश्वसनिय घटना घडल्या की, प्रेक्षकांना डोक्याला हात लावून बसावं लागलं होतं. (Mali women team got all out for 6 runs only in kwibuka t20 tournament on this day 18 june)

दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (18 जून 2019) हा जबरदस्त सामना खेळवण्यात आला होता. क्विबुका वुमन टी-20 टुर्नामेंटमध्ये (Kwibuka Women’s Twenty20 Tournament) हा सामना पाहायला मिळाला होता. या सामन्यात माली आणि रवांडा (Mali vs Rwanda) हे दोन संघ भिडले होते. माली संघाची कर्णधार यौमा सांगारे हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु रवांडा संघातील गोलंदाजांनी यौमाचा निर्णय चुकीचा ठरवला. कारण अवघ्या काही क्षणात मालीचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. मालीचा संपूर्ण संघ मिळून केवळ 6 धावा जमवू शकला. हो तुम्ही बरोबर वाचलं आहे. संपूर्ण संघ अवघ्या 6 धावांत गारद झाला. यामध्येही विशेष बाब म्हणजे संघातील 10 खेळाडू भोपळादेखील फोडू शकले नाहीत. संघासाठी सर्वाधिक व्यक्तिगत धावसंख्या ही 1 धाव इतकी होती. मालीची सलामीवीर मरियम सामाके हिने एक धाव केली होती. तर उर्वरित 10 खेळाडू शून्यावर बाद झाले होते.

6 पैकी 5 धावा एक्स्ट्रा मिळाल्या

तुम्ही आता विचार करत असाल की केवळ एकाच खेळाडूने 1 धाव केली आणि उर्वरित 10 फलंदाज शून्यावर बाद झाले तर मग संघाने 6 धावा कशा केल्या. त्याचं कारण म्हणजे मालीच्या संघाला 6 पैकी 5 धावा एक्स्ट्रा (वाईड बॉल, नो बॉल, लेग बाय, इत्यादी) मिळाल्या होत्या. या सामन्यातील अजून एक विशेष बाब म्हणजे रवांडाच्या कोणत्याही एका गोलंदाजीने मालीचा संपूर्ण संघ बाद केला नव्हता तर, ही एक सांघिक कामगिरी होती. मालीच्या संघाने 6 धावा 9 षटकांमध्ये जमवल्या होत्या.

रवांडाची गोलंदाज जोसियाना हिने 3 बळी मिळवले होते, तर बिमेनयिमाना आणि वुमिलियाने प्रत्येकी दोन फळंदाजांची शिकार केली होती. तसेच व्हेरोनिके इरोहो हिने 1 बळी मिळवला होता. मालीचे दोन फलंदाज धावबाद झाले होते. त्यानंतर 7 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या रवांडाच्या संघाला या 7 धावांसाठी फार मेहनत घ्यावी लागली नाही. रवांडाच्या सलामीच्या जोडीने अवघ्या 4 चेंडूत हा सामना जिंकला. क्रिकेट इतिहासातील सर्वात निच्चांकी धावसंख्या याच सामन्यात नोंदवण्यात आली होती.

संबंधित बातम्या

WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?

WTC 2021 : 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलचा बदला घेणार का टीम इंडिया?, पाहा काय घडलं होतं त्या दिवशी..!

(Mali women team got all out for 6 runs only in kwibuka t20 tournament on this day 18 june)