पाकिस्तानी संघाच्या हॉटेलमध्ये भीषण आग, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत प्रश्नचिन्ह?

पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानात आयोजित केली जाणार आहे. पण भारतीय संघाचा पाकिस्तानात जाण्यास साफ नकार आहे. त्यात अशा घटनेमुळे पीसीबी अडचणीत आली आहे.

पाकिस्तानी संघाच्या हॉटेलमध्ये भीषण आग, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत प्रश्नचिन्ह?
| Updated on: Nov 19, 2024 | 3:52 AM

एकीकडे भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करण्यात अडचण येऊ शकते. दरम्यान, सोमवारी एका हॉटेलमध्ये आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी महिला क्रिकेट खेळाडू राहत होत्या. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) कराचीत सुरू असलेल्या राष्ट्रीय महिला चॅम्पियनशिपच्या सामन्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

वृत्तानुसार, हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या पाचही क्रिकेटपटूंना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना लगेच हनिफ मोहम्मद हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये पाठवण्यात आले. पीसीबीकडून सांगण्यात आले की, खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेऊन ही स्पर्धा कमी करण्यात आली आहे. आता या स्पर्धेचा विजेता शोधण्यासाठी पीसीबीने अजिंक्य आणि स्टार्स यांच्यातील अंतिम सामना जाहीर केला आहे. या स्पर्धेत प्रत्येकी चार सामने खेळल्यानंतरही हे दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. अंतिम सामना कधी आणि कुठे होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीवर परिणाम होणार

राष्ट्रीय महिला चॅम्पियनशिप दरम्यान हॉटेलला लागलेल्या आगीचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरही परिणाम होऊ शकतो. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत हॉटेलमध्ये आग लागल्याची बातमी पीसीबीच्या अडचणी वाढवू शकते. भारत आणि पाकिस्तानमधील या संघर्षावर काय तोडगा निघेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण या आठवड्याच्या अखेरीस आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये समोर आले आहे.