Cricket : पृथ्वी शॉ याला संधी मिळालीच, ऋतुराजचाही समावेश, आगामी स्पर्धेसाठी टीम जाहीर, कर्णधार कोण?

Prithvi Shaw : निवड समितीने आगामी स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. निवड समितीकडून या संघात पृथ्वी शॉ तसेच ऋतुराज गायकवाड या जोडीचा समावेश केला आहे. जाणून घ्या.

Cricket : पृथ्वी शॉ याला संधी मिळालीच, ऋतुराजचाही समावेश, आगामी स्पर्धेसाठी टीम जाहीर, कर्णधार  कोण?
Prithvi Shaw and Ruturaj Gaikwad
Image Credit source: Hannah Peters/Getty Images/PTI/TV9 Bharatvarsh
| Updated on: Aug 14, 2025 | 5:25 PM

इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया आगामी आणि बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीशिवाय खेळणार आहे. रोहित आणि विराट या जोडीने कसोटी आणि टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यंदा 18 वी आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. त्यामुळे रोहित आणि विराट या जोडीला खेळता येणार नाही. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आशिया कप स्पर्धेसाठी आता भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याची प्रतिक्षा असतानाच मोठी बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनने आगामी बूची बाबू 2025 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. अंकीत बावणे हा या स्पर्धेत महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे. तसेच भारतीय संघातील ऋतुराज गायकवाड याचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियातून गेली अनेक वर्ष बाहेर असणाऱ्या पृथ्वी शॉ यालाही पहिल्याच झटक्यात महाराष्ट्र संघात संधी देण्यात आली आहे. पृथ्वीने काही दिवसांपूर्वी मुंबईची साथ सोडत एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र क्रिकेट संघात प्रवेश केला होता. तेव्हापासूनच पृथ्वीला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं.

पृथ्वी व्यतिरिक्त या संघात सचिन धस, अर्शीन कुलकर्णी, मुकेश चौधरी आणि राजवर्धन हंगरगेकर या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच सौरभ नवले आणि मंदार भंडारी या दोघांना विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली आहे.

बुची बाबू 2025 स्पर्धेसाठी महाराष्ट्र टीम : अंकीत बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, सिद्धेश वीर, सचिन धस, अर्शीन कुलकर्णी, हर्षल काटे, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ नवले (विकेटकीपर), मंदार भंडारी (विकेटकीपर), रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दढे, विकी ओस्तवाल, हितेश वाळुंज, प्रशांत सोळंकी आणि राजवर्धन हंगरगेकर.

मुंबईनंतर बुची बाबू स्पर्धेसाठी महाराष्ट्र टीम जाहीर

दरम्यान काही दिवसांपूर्वीच बुची बाबू स्पर्धेसाठी एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई संघाची घोषणा केली होती. त्यानुसार अंडर 19 भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तसेच सर्फराज आणि मुशीर या खान बंधुंना या स्पर्धेसाठी संघात संधी देण्यात आली आहे.