
IPL 2026 च्या तयारीला सुरुवात झाली आहे. पुढील महिन्यात लिलाव होणार आहे, मात्र त्यापूर्वी आता अनेक संघांनी खेळाडूंना ट्रेड केले आहे. गेल्या हंगामापर्यंत राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. चेन्नईचा हा निर्णय खूप खास मानला जात आहे. कारण सॅमसन आता धोनीसोबत खेळताना दिसणार आहे. आज आपण आयपीएलमध्ये संजू सॅमसन आणि एमएस धोनी यांचा रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊयात.
आयपीएलमधील यशस्वी खेळाडू संजू सॅमसनने आतापर्यंत एकूण 177 सामने खेळले आहेत, तर एमएस धोनीने 278 सामने खेळले आहेत. मात्र आज आपण या दोन्ही खेळाडूंच्या 177 आयपीएल सामन्यांवरील आकडेवारीची तुलना करणार आहोत. संजू सॅमसनने 177 आयपीएल सामन्यांच्या 172 डावांमध्ये 30.94 च्या सरासरीने 4704 धावा केल्या आहेत. तर धोनीने 177 सामन्यांमधील 159 डावांमध्ये 40.48 च्या सरासरीने 4048 धावा केल्या होत्या. सरासरीच्या बाबतीत धोनी पुढे आहे, तर धावांच्या बाबतीत सॅमसम आघाडीवर आहे.
संजू सॅमसन गेल्या काही वर्षांपासून चमकदार कामगिरी करत आहे. संजूने 177 सामन्यांमध्ये तीन शतके आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत. तर धोनीनी 177 आयपीएल सामन्यांमध्ये एकही शतक झळकावलेले नाही, मात्र त्याने 20 अर्धशतके झळकावली आहे. धोनी हा लोअर ऑर्डर फलंदाज असल्याने त्याच्या नावावर एकही शतक नाही.
संजू सॅमसनची 177 सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या 119 धावा आहे. तर 177 आयपीएल सामन्यांनंतर धोनीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 79 धावा ही आहे. संजू आणि धोनी आक्रमक फलंदाज आहेत, संजूने 177 आयपीएल सामन्यांमध्ये 219 षटकार आणि 379 चौकार मारले आहेत. तर धोनीने 177 आयपीएल सामन्यांमध्ये 277 चौकार आणि 187 षटकार मारले होते.
आयपीएल कारकीर्दीत संजू सॅमसनचा स्ट्राईक रेट 139.04 आहे. तर 177 आयपीएल सामन्यांनंतर एमएस धोनीचा स्ट्राईक रेट 137.64 होता. संजू हा आकडेवारीत धोनीच्या तुलनेत थोडासा सरस आहे, याचे कारण म्हणजे तो सलामीला किंवा वरच्या फळीत फलंदाजी करतो, तर धोनी हा मधल्या आणि खालच्या फळीत फलंदाजी करतो. आता संजू धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.