IPL 2022: सहा पराभवानंतर ‘आमच्यावर प्रचंड दबाव’, Mumbai Indians च्या संचालकाची कबुली

IPL 2022: पाचवेळा IPL स्पर्धेचं विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही.

IPL 2022: सहा पराभवानंतर आमच्यावर प्रचंड दबाव, Mumbai Indians च्या संचालकाची कबुली
मुंबई इंडियन्स संघ
Image Credit source: IPL
| Updated on: Apr 18, 2022 | 6:10 PM

मुंबई: पाचवेळा IPL स्पर्धेचं विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. सलग सहा सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विजयाचं खात अजून उघडलेलं नाही. कोणीही मुंबई इंडियन्सकडून इतक्या सुमार कामगिरीची अपेक्षा केली नव्हती. सलग होत असलेल्या पराभवांमुळे मुंबई इंडियन्सवर दबाव स्पष्ट दिसतोय. आता संघाचे संचालक झहीर खान (Zahir khan) यांनी सुद्धा ही गोष्ट कबूल केली आहे. संघावर प्रचंड दबाव असल्याचं, भारताच्या माजी गोलंदाजाने मान्य केलं आहे. पुनरागमन करण्यासाठी झोकून देऊन खेळ करण्याचं त्याने खेळाडूंना आवाहन केलं आहे. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स असा एकमेव संघ आहे, ज्यांच्या वाट्याला अजून विजय आलेला नाही.

मुंबईचा पुढचा सामना चेन्नई विरुद्ध

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना होत आहे. चेन्नईच्या टीमचीही मुंबई इंडियन्स सारखी स्थिती आहे. फक्त त्यांना एक विजय मिळवता आलाय, हाच काय तो फरक आहे. चेन्नईच्या टीमने मागच्या सहा सामन्यात पाच सामने गमावले असून फक्त एक विजय मिळवला आहे.

निराशाचे क्षण पचवून पुढे जावं लागेल

“क्रिकेट एक सांघिक खेळ आहे. आम्हाला एकत्र रहावं लागेल. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मार्ग शोधावा लागेल. प्रत्येक सीजनचं स्वत:च एक आव्हान असतं. प्रचंड दबाव आहे. त्यामुळे आम्हाला त्या पद्धतीचा खेळ दाखवावा लागेल. निर्धार आणि लढण्याची वृत्ती दाखवावी लागेल. निराशेचे क्षण पचवून पुढे जावं लागेल. क्रिकेट तुम्हाला हेच शिकवतं” असे झहीर खान मिड डे शी बोलताना म्हणाला.

प्रत्येक दिवस तुमचा नसतो

झहीर खानने बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविस आणि दुसरा युवा फलंदाज तिलक वर्माचं कौतुक केलं. “युवा खेळाडू भागीदारी करतात. मैदानावर जाऊन ते गोलंदाजांवर दबाव निर्माण करतात. आम्हाला अशाच खेळाची आवश्यकता आहे. काहीतरी करुन दाखवण्याचा, बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे” असं झहीर खानने सांगितलं. “प्रत्येक दिवस तुमचा नसतो. तुम्ही त्या परिस्थितीला कसे सामोरे जाता. तुम्ही त्यातून काय शिकता. मी निराश चेहेर पाहिले आहेत. पण निर्धारही पाहिला आहे” असं झहीर खान म्हणाला.