
पाकिस्तान क्रिकेट टीमची न्यूझीलंड दौऱ्यात हाराकिरी सुरुच आहे. पाकिस्तानने टी 20i नंतर एकदिवसीय मालिकाही गमावली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानचा दुसऱ्या आणि निर्णायक सामन्यात 84 धावांनी धुव्वा उडवला आणि मालिका जिंकली. न्यूझीलंडने या 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे पाकिस्तानला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरा सामना जिंकणं गरजेचं होतं. मात्र न्यूझीलंडने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 293 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानला जेमतेम 200 धावा करता आल्या. पाकिस्तानला धड 42 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडने पाकिस्तानला 41.2 ओव्हरमध्ये 208 धावांवर गुंडाळलं. न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
पाकिस्तानचे टॉप आणि मिडल ऑर्डरमधील सर्व फलंदाज अपयशी ठरले. पहिल्या 5 फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यानंतर तय्यब ताहीर आणि फहीम अश्रफ या दोघांनी काही वेळ मैदानात खेळून काढला. त्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांना काही वेळ विजयाची आशा होती. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी या दोघांना आऊट केलं. फहीमने सर्वाधिक 73 धावा केल्या. तर तय्यबने 13 धावांचं योगदान दिलं. तर 10 व्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या नसीम शाह याने उल्लेखनीय खेळी केली. नसीमने 44 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर सुफियान मुकीमने नाबाद 13 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी अखेरीस केलेल्या या खेळीमुळे पाकिस्तानचा मोठा पराभव टळला.
न्यूझीलंडसाठी बेन सियर्स याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर जेकब डफीने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. नॅथम स्मिथ आणि विलियम ओरुर्क या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 292 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी मिचेल हे याने सर्वाधिक 99 धावांचं योगदान दिलं. मिचेल शतक पूर्ण करण्यापासून 1 धाव दूर राहिला. मिचेलने 7 सिक्स आणि 7 फोरसह नॉट आऊट 99 रन्स केल्या. तसेच न्यूझीलंडच्या अव्वल 6 फलंदाजांनी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. त्यामुळेच न्यूझीलंडला 292 धावांपर्यंत पोहचता आलं.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : निक केली, रिस मार्यू, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), मुहम्मद अब्बास, मिशेल हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, जेकब डफी, बेन सियर्स आणि विल्यम ओरोर्क.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम, मोहम्मद रिजवान (कर्णधार आणि विकेटकीपर), सलमान आघा, तैयब ताहिर, फहीम अशरफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, हरिस रौफ, सुफियान मुकीम आणि अकिफ जावेद.