
सलग 2 सामन्यांमधील पराभवानंतर पाकिस्तानने अखेर करो या मरो सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तानने कॅनडा विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. पाकिस्तानने कॅनडाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी बोलावलं. कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 106 धावा केल्या. पाकिस्तानने 107 धावांचं विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.3 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि कॅप्टन बाबर आझम या दोघांनी विजयात मोठी भूमिका बजावली. मोहम्मद रिझवाने याने नाबाद आणि सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर बाबरने 33 धावा दिल्या. पाकिस्तानच्या या पहिल्या विजयानंतर कॅप्टन बाबर आझमने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.
“आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आम्हाला हा विजय हवा होता. विजयाचं श्रेय हे टीमचं आहे.आम्ही चांगली सुरुवात केली आणि नवीन बॉलने विकेट्स घेतल्या. पहिली सहा षटके येथे अत्यंत महत्त्वाची आहेत. तुम्ही 6 षटकांनंतर मूल्यांकन करा. मग आम्ही फिरकीपटूंचा सामना करण्याचा प्रयत्न केला. त्याच मानसिकतेने आम्ही जाणार आहोत. फ्लोरिडाची परिस्थिती इथूनही चांगली असावी. मी अजूनही माझ्या स्तरावर चांगले प्रयत्न करतो”, असं बाबरने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं.
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्टइंडिजमध्ये करण्यात आले आहेत. साखळी फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील सामने हे विंडिजमध्ये होणार आहेत. काही सामने फ्लोरिडा आणि इतर ठिकाणी होणार आहेत. बाबरने यावरुन फ्लोरिडाची परिस्थिती चांगली असेल, असा आशावाद व्यक्त केला.
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन : साद बिन जफर (कॅप्टन), श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, रविंदरपाल सिंग, डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी आणि जेरेमी गॉर्डन.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.