
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत न्यूझीलंड क्रिकेट टीमने विजयी सलामी दिली आहे. न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानचा 60 धावांनी धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 321 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने अखेरपर्यंत झुंज देत 250 पार मजल मारली. मात्र ते प्रयत्न विजयासाठी पुरेसे ठरले नाहीत. न्यूझीलंडने पाकिस्तानला 47.2 ओव्हरमध्ये 260 धावांवर गुंडाळलं आणि पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंडने यासह विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी झालेल्या ट्राय सीरिजमध्ये पाकिस्तानचा साखळी फेरीत आणि अंतिम सामन्यात पराभव केला होता.
विल यंग आणि टॉम लॅथम या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 320 धावा केल्या. विल यंग याने 107 आणि टॉम लॅथमने 118 धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने 61 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 321 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानला ठराविक अंतराने झटके दिले. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि खुशदिल शाह या दोघांनी अर्धशतकी खेळी करुन विजयाच्या आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र इतरांना न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा प्रतिकार करता आला नाही. पाकिस्तानसाठी खुशदिल शाह याने 69 आणि बाबर आझम याने 64 धावा केल्या. फखर जमान याने 24 धावा जोडल्या. तर इतरांना 20 पेक्षा पुढे मजल मारता आली नाही. न्यूझीलंडकडून कॅप्टन मिचेल सँटनर आणि विलियम ओरुर्के या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. मॅट हॅन्री याने दोघांना बाद केलं. तर मायकल ब्रेसवेल आणि नॅथन स्मिथ या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि विल्यम ओरुर्के.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.