
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कसोटी आणि टी 20i मालिका खेळवण्यात आली. दक्षिण आफ्रिकेने दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने कसोटीप्रमाणे टी 20i मालिकेतही विजयी सलामी दिली. मात्र पाकिस्तानने त्यानंतर सलग 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर 2-1 ने विजय मिळवला. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना हा मंगळवारी 4 नोव्हेंबरला होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना फैसलाबादमधील इक्बाल स्टेडियममध्ये होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल.तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर मोबाईलवर हा सामना Sports TV या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.
मॅथ्यू ब्रिट्झके या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर शाहिन शाह आफ्रिदी या मालिकेतून एकदिवसीय कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. शाहिन मोहम्मद रिझवान याची जागा घेणार आहे. तसेच या मालिकेत मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या दोघांच्या कामगिरीकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. तसेच या मालिकेत बाबरला खास कामगिरी करण्याची संधी आहे.
बाबरने आतापर्यंत टेस्ट, वनडे आणि टी 20i क्रिकेटमध्ये मिळून एकूण 326 सामन्यांमध्ये 14 हजार 959 धावा केल्या आहेत. बाबर 14 हजार धावांपासून 41 रन्स दूर आहे. आतापर्यतं पाकिस्तानच्या इंझमाम उल हक, युनिस खान, मोहम्मद युसूफ आणि जावेज मियाँदाद या चौघांनीच 14 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. त्यामुळे बाबरचा पहिल्याच सामन्यात 41 धावा करुन खास क्लबमध्ये पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.