Pakistan Cricket : पाकिस्तानचे 17 दुर्देवी खेळाडू, काहींसाठी पहिलाच सामना शेवटचा! कोण आहेत ते?

आपल्या देशासाठी खेळायचं आणि स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असतो. मात्र या प्रयत्नात प्रत्येक खेळाडू यशस्वी होतोच असं नाही. काही खेळाडूंना वारंवार संधी दिली जाते. तर काहींसाठी पहिलाच सामना शेवटचा ठरतो.

Pakistan Cricket : पाकिस्तानचे 17 दुर्देवी खेळाडू, काहींसाठी पहिलाच सामना शेवटचा! कोण आहेत ते?
Pakistan Cricket Team
Image Credit source: PCB
| Updated on: Aug 26, 2025 | 4:33 PM

आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. प्रत्येक खेळाडू हेच स्वप्न उराशी घेऊन प्रयत्न करत असतो. काही खेळाडू यशस्वी ठरतात. निवडक खेळाडू अवघ्या काही वर्षातील कामगिरीच्या जोरावर कॅप्टनही होतात. मात्र काही खेळाडूंबाबत 2-3 सामन्यांमधील कामगिरीच्या आधारावर निर्णय घेतला जातो. त्यामुळे त्या खेळाडूंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसर होते. त्यामुळे ते खेळाडू इतर स्पर्धेत खेळत राहतात. मात्र निवड समितीकडून त्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळतच नाहीत. पाहता पाहता हे खेळाडू क्रिकेटमधून असे गायब होतात की काही वर्षांनी त्यांची नावं आणि चेहराही आठवेनासा होतो. प्रत्येक संघाचे असे कमी जास्त प्रमाणात खेळाडू आहेत. आपण पाकिस्तानच्या 17 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात जे असेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गायब झाले ते कधी परतलेच नाहीत.

पाकिस्तानचे 17 खेळाडू कोण?

अब्दुर रउफ याने पाकिस्तानसाठी 2008 साली वनडे आणि टी 20 तर 2009 मध्ये कसोटी पदार्पण केलं. अब्दुरला काही महिन्यांमध्येच तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. मात्र अब्दुरची कारकीर्द औटघटकेची ठरली. अब्दुरला 3 कसोटी, 4 वनडे आणि फक्त 1 टी 20i सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानतंर अब्दुरला संधी मिळालीच नाही.

अदनान अकमल

क्रिकेट चाहत्यांना कामरान आणि उमर या अकमल बंधुंबाबत माहिती आहे. या दोघांनी पाकिस्तानसाठी अनेक वर्ष योगदान दिलं. मात्र त्यांचा भाऊ अदनान अकमल याला फार संधी मिळाली नाही. अदनानने 2010 मध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अदनानला 2014 साली टीममधून बाहेर करण्यातं आलं. त्यानंतर तो बाहेर गेलाच तो गेला.

काही खेळाडूंना 5-6 सामनेच खेळण्याची संधी मिळाली. असद अली या वेगवान गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे आणि टी 20 मध्ये फक्त 6 सामन्यातच खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर तोही गायब झाला. ओपनर अवेस जिया याला 2012 ते 2014 दरम्यान 5 टी 20i सामने खेळता आले. त्यानंतर जिया पुन्हा दिसलाच नाही.

अयूब डोगर याला एकाच कसोटी सामन्यात संधी मिळाली. इमरान खान ज्यूनिअर 3 टी 20i सामने खेळला. कामरान हुसैन याला 2 सामनेच खेळण्याची संधी मिळाली. कामरानच्या कारकीर्दीची सुरुवात 27 जानेवारीला झाली. तर 30 जानेवारीला द एंड झाला. मन्सूर अमजद याला 2 सामन्यातच संधी मिळाली. मन्सूरचा टी 20i आणि वनडे पदार्पणातील पहिलाच सामना शेवटचा ठरला.

मोहम्मद खलील याच्या कारकीर्दीला 2 कसोटी आणि 3 वनडेनंतर ब्रेक लागला. विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद सलमान 2 कसोटी आणि 7 एकदिवसीय सामन्यांनंतर गायबच झाला.

ओपनर नोमान अनवर फक्त एका टी 20i सामन्याचा पाहुणा ठरला. मुख्तार अहमद ओपनर म्हणून पाकिस्तानसाठी 6 टी 20i सामने खेळला. रमीज राजा ज्युनिअर याला 2 टी 20i सामन्यांमध्येच संधी मिळाली. शाहीन शाह अफ्रिदी याचा मोठा भाऊ रियाज याला एका सामन्यातच संधी मिळाली. कसोटी पदार्पणातील सामना त्याच्यासाठी शेवटचा ठरला.

साद अली याला 2 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. विकेटकीपर बॅट्समन शकील अन्सार हा देखील 2 टी 20i सामन्यांचा पाहुणा ठरला. वेगवान गोलंदाज वकास मकसूद याला फक्त एकच टी 20i सामना खेळता आला.