पाकिस्तान क्रिकेटपटूचा क्रिकेट सोडण्याचा तडकाफडकी निर्णय, कारण देताना सांगितलं की…

पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने अचानक क्रिकेटला ब्रेक दिल्याने क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला याबाबतची माहिती दिली आहे. तसेच काही काळ संघ निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

पाकिस्तान क्रिकेटपटूचा क्रिकेट सोडण्याचा तडकाफडकी निर्णय, कारण देताना सांगितलं की...
पाकिस्तान क्रिकेटपटूने अचानक क्रिकेटमधून घेतला ब्रेक
Image Credit source: Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Apr 25, 2025 | 7:40 PM

पाकिस्तान क्रिकेट संघात एक मोठी उलथापालथ झाल्याची बातमी समोर आली आहे. एका स्टार पाकिस्तानी खेळाडून क्रिकेटला ब्रेक दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं कारण देत क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. याबाबतची माहिती अनुभवी खेळाडू निदा डार हीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. नुकतंच निदाने फिटनेस टेस्टसाठी हजेरी लावली होती. त्यानंतर तिला सराव शिबिरात रूजू होण्यास सांगितलं होतं. पण तिने अचानक क्रिकेटला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. निदा डार पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. निदाने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, माझ्या स्थितीबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवलं आहे. पण तिच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.

39 वर्षी निदा डारने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलं की, ‘काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, मी माझ्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी क्रिकेटमधून तात्पुरता ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.अलिकडच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांमुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे आणि मला स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडा वेळ काढण्याची गरज आहे. या काळात तुम्ही माझ्या गोपनीयतेबद्दल दाखवलेल्या समजुतीबद्दल आणि आदराबद्दल मी आभारी आहे. माझ्या प्रियजनांच्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे आणि जेव्हा मी तयार असेन तेव्हा क्रिकेटच्या मैदानावर परत येण्यास उत्सुक आहे.’

निदा डारने पाकिस्तान क्रिकेटसाठी आतापर्यंत 112 वनडे आणि 160 टी20 सामने खेळले आहेत. यात वनडेत तिने 108 विकेट घेतल्या आहेत. तर 1690 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 144 विकेट्स आणि 2091 धावा आहेत. निदा डार महिला नॅशनल टी20 कपमध्ये खेळली नव्हती. निदाने आंतरराष्ट्रीय पातळीवर शेवटचा सामना ऑक्टोबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. निदा दारच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची कामगिरी खराब झाली होती. त्यामुळे तिच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं होतं.