PAK vs SA: ‘करो या मरो’ मॅचमध्ये पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

PAK vs SA: टीम इंडिया असलेल्या ग्रुप 2 मध्ये अजूनही रंगत संपलेली नाही

PAK vs SA: करो या मरो मॅचमध्ये पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय
Shadab khan
| Updated on: Nov 03, 2022 | 5:55 PM

सिडनी: ‘करो या मरो’ मॅचमध्ये आज पाकिस्तानने आपल्या खेळाचा स्तर उंचावला. सिडनीमध्ये झालेल्या या मॅचमध्ये पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर डकवर्थ लुइस नियमाने 33 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानचा आज पराभव झाला असता, तर त्याचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपलं असतं. या विजयामुळे पाकिस्तानच आव्हान अद्याप कायम आहे. पण सेमीफायनल गाठण्यासाठी त्यांना ग्रुप 2 मधील दुसऱ्या निकालावर अवलंबून रहाव लागेल.

पावसाने आजही गणित बिघडवलं

भारत-बांग्लादेश सामन्याप्रमाणे या मॅचमध्येही पावसाने व्यत्यय आणला. वेळ वाया गेल्यामुळे षटकं कमी करण्यात आली. पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी घेतली होती. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 185 धावा केल्या होत्या. 9 ओव्हर्सनंतर दक्षिण आफ्रिकेच्या 4 बाद 69 स्थिती होती. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे सामना 20 ऐवजी 14 षटकांचा करण्यात आला.

शाहीन शाह आफ्रिदीचा भेदक मारा

दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 30 चेंडूत 73 धावा फटकावण्याच अवघड लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. आफ्रिकेच्या टीमला हे लक्ष्य गाठणं जमलं नाही. फलंदाजांप्रमाणे पाकिस्तानी गोलंदाजांनी आज जबरदस्त कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक सलामीवीर क्विंट डि कॉकला शाहीन शाह आफ्रिदीने खातही उघडू दिलं नाही. त्याला मोहम्मद हॅरिसकरवी झेलबाद केलं. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

आफ्रिकेला जमलं नाही

रिली रुसोही 7 धावांवर स्वस्तात बाद झाला. 66 धावात दक्षिण आफ्रिकेचा चार फलंदाज तंबूत परतले होते. पावसानंतर खेळ सुरु झाल्यावर क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्सने आक्रमक फटकेबाजी केली. त्यांनी धावगती वाढण्याचा प्रयत्न केला. पण क्लासेन फटकेबाजीच्या प्रयत्नात शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर 15 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर अन्य फलंदाजही फार काही करु शकले नाही. 14 षटकांअखेरीस त्यांची 9 बाद 108 स्थिती होती. त्यांनी हा सामना 33 धावांनी गमावला.

त्या दोघांची जबरदस्त बॅटिंग

पाकिस्तानकडून लोअर ऑर्डरमध्ये शादाब खान आणि इफ्तिखार अहमदने जबरदस्त बॅटिंग केली. इफ्तिखारने 35 चेंडूत 51 तर शादाबने 22 चेंडूत 52 धावा चोपल्या. इफ्तिखारने 3 चौकार आणि 2 षटकार मारले, शादाब खानने 3 चौकार आणि 4 षटकार लगावले. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 षटकात 9 बाद 185 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 186 धावांच मोठं लक्ष्य ठेवलं आहे.